MPSC Success Story मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे विश्वजीत गाताडेचा शैक्षणिक प्रवास घडलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालक्यातील म्हाळुंगे या लहानशा गावातील विश्वजीत जालंधर गाताडे याची जडणघडण झाली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले. विश्वजीत यांनी चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला. माध्यमिक शिक्षण बाहेर कुठे न घेता गावातीलच राजश्री शाहू हायस्कूल मध्ये घेतले. तिथे देखील आपली यशाची कमान उंचावत ठेवत दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण घेत केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला. त्याला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे स्वप्न होते. हेच स्वप्न उराशी बाळगून त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. संख्याशास्त्र विषयातून बीएससी पूर्ण केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेवर पूर्णवेळ लक्ष केंद्रीत केले.विश्वजीतचे वडील जालंदर गाताडे हे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. तर आई जयश्री गाताडे या गृहीणी आहेत. आजोबांनी गावोगावी फिरस्ती करून छोटे-छोटे व्यापार करीत कुटुंबाला सावरले.
विश्वजीतला पण या सगळ्याची जाणीव होती.अभ्यासासाठी त्यांनी इंटनेटचा पुरेपूर वापर केला. घरीच राहून विविध पुस्तके, युट्युब, टेलिग्राम अशा माध्यमांतून त्यांनी अभ्यास केला. सेल्फ स्टडीतूनच विश्वजीत यांनी दुहेरी यश संपादन केले असून आता उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. कोरोनाचा काळ आणि त्यानंतर होणाऱ्या ह्या सर्व परीक्षा तसं बघितले तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग तसा खडतर आणि संयमाची सचोटी विश्वजितचा प्रवास होता.
पण जिद्दीने अभ्यास करून याच एमपीएससी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा यशाला गवसणी घालून ओबीसी वर्गातून राज्यात तिसरा येण्याचा मान विश्वजीत गाताडे यांनी पटकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात राज्यात बारावा क्रमांक पटकावला. मात्र, उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी अभ्यास सुरूच ठेवला. दरम्यानच्या काळात २०२१ ची राज्यसेवा परीक्षा दिली.तर एकूणात राज्यात अकरावा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे त्याचे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मित्रांनो, तुम्ही देखील ध्येयवादी दृष्टिकोन, प्रचंड जिद्द आणि अभ्यासातील सातत्य याआधारे चांगले यश संपादन करू शकता.