नीला सत्यनारायण
लोकसेवा स्पर्धा परीक्षेत सर्वात मोठी भीती मुलाखतीची असते. लेखी परीक्षा बरीच मुले पास होतात. आता सबंध राज्यभर कोचिंग क्लासेस आहेत. तेथे लेखी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र मुलाखत हा एक वेगळा अनुभव आहे.
इंग्रजीत आपण पेपर लिहितो; परंतु बोलायची वेळ आल्यावर गडबडतो. त्याचे कारण आपल्याला रोज सातत्याने इंग्रजी बोलायची सवय नसते. कॉनव्हेंन्टमधील मुले फाडफाड इंग्रजी बोलतात. त्याचा प्रचंड न्यूनगंड आपल्या मनात बसतो. आपल्याला इंग्रजीत विचार करता येत नाही. आपण मराठीत किंवा आपल्या भाषेतच विचार करतो. मग तो इंग्रजीमध्ये भाषांतरीत करतो. यामध्ये वेळ जातो. नेमका शब्द न सापडल्यास फजिती होते. मुलाखतीच्यावेळी आपली देहबोली समोरच्याला हे स्पष्ट जाणवून देते की आपण घाबरलो आहोत. अशाने आपले मूल्यमापन करताना परीक्षक लक्षात ठेवतो की आपल्याजवळ OLQ (officer like qualities) नाहीत. मग थोडक्यात आपली संधी हुकते.
या सर्वांवर उपाय काय ? घरी इंग्रजी बोलले जात नाही, किंवा ज्यांच्याकडे इंग्रजी बोलण्याचा सराव करण्याचे साधन नाही अशा मुलांना मुलाखतीची भीती जास्त वाटते. मीही या दिव्यातून गेले आहे. त्यावेळी महाराष्ट्रात आठवीपासून इंग्रजी शिकवायचे. त्यामुळे इंग्रजी बोलण्याची भीती वाटायची. मी नववीत असताना दिल्लीला गेले. तेथे माझी बोर्डाची परीक्षा झाली. मी संस्कृतमध्ये बोर्डात प्रथम आले. त्यामुळे मी कॉलेजची अॅडमिशन घ्यायला गेले की, संस्कृत घेऊन बी.ए. कर, असे मला सागितले जायचे. संस्कृत घेऊन मी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली असती तर काही बिघडले नसते. परंतु ज्ञानाची कवाडे उघडायची असतील, आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल तर इंग्रजी भाषेला पर्याय नाही. मग आपणच ती भाषा आत्मसात का करु नये ? त्यामुळे पहिली गोष्ट ही होईल की माझ्या मनातली इंग्रजीची भीती निघून जाईल. माझा न्यूनगंड नाहीसा होईल.
मी इंग्रजी विषय घेऊन बी.ए. झाले. मग पुन्हा इंग्रजी घेऊन एम.ए. झाले. इंग्रजी बोलता यावे यासाठी आधी घरातल्या घरात भावंडांशी, आई वडीलांशी इंग्रजी बोलायला सुरुवात केली. कॉलेजमध्येही कटाक्षाने मैत्रिणींशी इंग्रजीत बोलायचा चंग उचलला. त्याच्या जोडीला रोज इंग्रजी वर्तमानपत्रातून आठ ते दहा ओळी निवडून त्या मोठयाने वाचायला सुरुवात केली. मग त्या ओळींचा अर्थ सोप्या भाषेत पण इंग्रजीत वडिलांना सांगायला सुरुवात केली. जनरल नॉलेज वाढविण्यासाठी काही मासिके, काही पुस्तके वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला फार जड गेले. सारखे मराठी शब्दच तोंडात येत. त्यामुळे इंग्रजीत विचार करायची सवय लावून घेतली. आता प्रश्न होता उच्चारांचा. त्यासाठी डिक्शनरीचा आधार घेतला. थेसॉरसही अश्यावेळी फार उपयोगी पडला. इंग्रजी बोलताना सारखे आपण ‘दुसरी’ भाषा बोलतो आहोत, याची जाणीव व्हायची. त्यामुळे एक प्रकारचा अवघडलेपणा यायचा. त्यासाठी आरशासमोर बोलण्याचा सराव केला.
मनातील दुसरा शत्रू मुलाखतीबद्दलची भीती. प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा तिथले वातावरण, अपरिचीत वास्तू यामुळे आपल्या मनात धडकी भरते. मुलाखत घेणारी माणसे आपल्याला येणारेच प्रश्न विचारतील, की भलतेच काही, अशी धास्ती वाटत असते. यासाठी शक्यतो ज्या ठिकाणी आपली मुलाखत आहे, ती जागा आधी पाहून ठेवावी. मुलाखत घेणारे कुठे बसणार, आपण कुठून प्रवेश करणार, आपली बसायची जागा कुठली, याचा पूर्ण अभ्यास करावा. आपली मुलाखत कोण घेणार आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे शोधायचा प्रयत्न करावा. ती माणसे ज्या विषयात तज्ज्ञ आहेत त्याला धरून प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम अपरिचित विषयावर प्रश्न समोर येऊन आपली फजिती होत नाही.
मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत असेलच असे नाही. अशावेळी बतावणी करून वेळ मारुन नेणे अगदी चुकीचे. उत्तर माहीत नाही, असे प्रांजळपणे कबूल करणे योग्य. काही प्रश्न गुगलीसारखे असतात, काही राजकारणाशी निगडित असतात. अश्यावेळी ‘हे माझे मत आहे’ असे स्पष्ट करावे. त्याने समोरचा माणूस दुखावत नाही.
एखाद्या मुलाखतकाराच्या बोलण्याने वाईट वाटले तरी ते चेहऱ्यावर दाखवू नये. अनेकदा प्रश्नकर्ता आक्रमक होतो, वा एखाद्या गोष्टीचा कीस काढत बसतो. या मागची भूमिका तुमचा संयम जोखण्याची असते. आपण अशावेळी रागावलो, उद्दीप्त झालो किंवा संयम सोडला तर हानी आपलीच होते. हे सगळे आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्याला मुद्दाम डिवचत आहेत याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
चेहरा शांत आणि संयमी असावा. भाषा मृदू परंतु स्पष्ट असावी. आपली मते ठाम असावीत. आपल्या देहबोलीत कुठेही उग्रपणा किंवा उद्दामपणा नसावा. मुलाखतीनंतर मुलाखतीचा सारांश लिहायचा असतो. त्यासाठी मुलाखतीच्यावेळी विचारलेले प्रश्न आणि आपली उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. झालेली मुलाखत थोडक्यात पण प्रभावी पद्धतीने आपल्याला मांडता येते का याची ती परीक्षा असते.
थोडक्यात काय, तर मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची, ज्ञानाची, प्रामाणिकपणाची आणि आपल्या सच्चेपणाची परीक्षा असते. त्यामुळे आपण सहज-सुंदर राहावे.
अनेकांना असे वाटते की मुलाखतीसाठी विशेष कपडे घालणे आवश्यक आहे. त्याची खरे तर काहीच आवश्कता नसते. आपण छान कपडे घालून गेलो की बघणाऱ्याला आपल्याकडे पाहून प्रसन्न वाटते. परंतु अनेकांना भारी कपडे घेणे परवडत नाही. त्यामुळे आपले साधेच कपडे व्यवस्थित घालून गेल्याने काहीही नुकसान होत नाही. चेहऱ्यावरचा भाव महत्त्वाचा. चेहरा प्रसन्न आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण हवा. फाजिल अभिमानही नको. थोडक्यात, आपण जसे आहोत तसेच मुलाखतकारांसमोर सादर व्हावे. आपल्यातल्या प्रामाणिकपणाने आणि साधेपणाने आपल्याला कोणालाही जिंकून घेता येते.
(महाराष्ट्र टाइम्सच्या संकेस्थळावरून साभार. नीला सत्यनारायण यांचा हा लेख दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या ‘प्रगती फास्ट’ या सदरात याआधी प्रसिद्ध झाला आहे.)
ताज्या अपडेटसाठी मिशन एमपीएससी फेसबुक पेजला लाइक करा