⁠  ⁠

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 2 Min Read
2 Min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्सच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात मोदी ८८ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ५८ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (५७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

प्यू रिसर्च संस्थेने २,४६४ भारतीयांशी संवाद साधून सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. २१ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु होत्या. ‘बहुतांश जनता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल समाधानी आहे. त्यामुळेच मोदींची लोकप्रियता कायम आहे,’ असे प्यू रिसर्च संस्थेने म्हटले आहे. दर दहापैकी आठ भारतीयांना देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ‘चांगली’ वाटते, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे. हे प्रमाण २०१४ नंतर १९ टक्क्यांनी वाढले आहे.

‘अर्थव्यवस्थेची स्थिती ‘अतिशय उत्तम’ असल्याचे मत व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांमध्ये तिपटीने वाढले आहे. तर दर १० पैकी ७ लोक देशातील परिस्थितीविषयी समाधानी आहेत. अशा लोकांचे प्रमाण २०१४ नंतर दुपटीने वाढले आहे,’ असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. ‘आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेतील राज्यांपैकी दर दहापैकी नऊजणांनी मोदींवर विश्वास दाखवला आहे,’ असेही आकडे सांगतात.
पूर्व भारतातही मोदींची लोकप्रियता कायम आहे. बिहार, झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील १० पैकी ८ जणांनी मोदींना पसंती दिली. तर उत्तर भारतातील दिल्ली, हरयाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही मोदींची लोकप्रियता कायम आहे. ‘२०१५ पासून मोदींची उत्तर भारतातील लोकप्रियता किंचतही कमी झालेली नाही. तर पश्चिम आणि दक्षिणेतील त्यांची लोकप्रियता वाढली आहे. मात्र पूर्व भारतातील मोदींच्या लोकप्रियतेत थोडी घट झालेली आहे,’ असे सर्वेक्षण सांगते.

TAGGED:
Share This Article