कुलभूषण जाधव यांना सल्लागार देण्यास पाकचा नकार
तथाकथित हेर असल्याच्या आरोपखाली पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभुषण जाधव यांना सल्लागाराची मदत देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे.
भारताने जाधव यांना सल्लागाराची मदत देण्यासंबंधी अर्ज केला होता. तो पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. सल्लागाराच्या नावाखाली भारत जाधव यांच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.आंतरराष्ट्रीय कोर्टमध्ये (आयसीजे- इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस) पाकने दावा केला आहे की, व्हिएन्ना कॉन्व्हेंशन अंतर्गत सल्लागाराची मदत केवळ सामान्य कैद्यांना देण्याची तरतूद आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कैद्यांना अशी मदत मिळू शकत नाही. कुलभुषण जाधव हे भारताचे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. त्यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाक लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी करणे व अशांती पसरवणे या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली असून कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.