पॅरेडाईज पेपर्सचा धमाका
पनामा पेपर्स नंतर पॅरेडाईज पेपर्स नावाचा नवा धमाका झाला आहे. पॅराडाईज पेपर्स म्हणजे जगभरातील श्रीमंत आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी ऑफशोअर फायनान्स अर्थात परदेशात केली जाणारी गुंतवणूक कंपन्यांमार्फत गुंतवलेल्या पैशासंदर्भातली कागदपत्रे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा, भाजपचे खासदार आर. के. सिन्हा आणि अभिनेता संजय दत्त यांची पत्नी मान्यता यांच्यासह ७१४ भारतीयांची नावे आली आहेत. हा प्रचंड गुंतागुंतीचा व किचकट विषय समजून घेण्यासाठी सर्वात आधी ’पॅरडाईज पेपर्स’ व ’टॅक्स हॅवन्स’ म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे. फ्रेंचमध्ये टॅक्स हॅवन्सला ’पॅराडाईज फिस्कल’ असे म्हणतात. त्यावरूनच या गौप्यस्फोटाला ’पॅरडाईज पेपर्स’ असे नाव पडले. ’स्युडडॉएश झायटुंग’ या जर्मन वृत्तपत्राने २०१६ च्या पनामा पेपर्ससोबतच पॅरडाईज पेपर्स मिळवले होते. इंटरनॅशनल कन्सॉरशियम फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स या शोधपत्रकारांच्या आंतराष्ट्रीय समूहाने हे प्रकरण उघडकीस आणण्यात मोठी भुमिका निभावली. जगभरातील ६७ देशातील प्रतिष्ठित पत्रकार या समूहामध्ये आहेत. १०० पेक्षा अधिक माध्यमांशी या संस्थेची भागीदारी आहे. यामुळे याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस सहसा कोणी करु शकणार नाही.’पॅरडाईज पेपर्स’ या गौप्यस्फोटात १.३४ कोटी कागदपत्रांचा समावेश आहे.
टॅक्स हॅवन्स म्हणजे काय?
ज्या देशांमध्ये गुंतवणुकीवर कर किमान किंवा पूर्णतः माफ असतो, अशा देशांना टॅक्स हॅवन्स म्हणतात. अशा देशांमध्ये गर्भश्रीमंत लोक मध्यस्थ कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवतात. या देशांमध्ये गुंतवणूक करणार्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते.स्वित्झर्लंड, आयर्लंड आणि नेदरलँड्समध्ये कर कमी करणार्या काही अशाच यंत्रणा आहेत, तर ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये अशा प्रकारला प्रोत्साहन देणारी करसंरचना आहे. म्हणून या देशांमधले लोक कर बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी टॅक्स हॅव्हन्सचा वापर करतात. याच देशांपैकी एक म्हणजे बरम्युडा, जिथली अॅपलबी कंपनी या सगळ्या प्रकरणाचा एक मुख्य दुवा आहे. अॅपलबीच्या सहाय्याने अनेक अशिलांनी आपला पैसा या टॅक्स हॅवन्समध्ये गुंतवला आहे. बर्म्युडा येथे मुख्यालय असलेल्या अॅपलबी कंपनीचे ६० लाख कागदपत्रं, सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या एशिया सिटी ट्रस्टचे काही कागदपत्रं आणि १९ अधिकारक्षेत्रात असलेल्या कंपन्यांची काही कागदपत्रं ’स्युडडॉयश झायटुंग’ या जर्मन वृत्तपत्राने मिळवली. नंतर त्यांनी ही कागदपत्रं इंटरनॅशनल कन्सॉरशियम फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स यांच्याकडे सोपवली. १९५० ते २०१६ या काळातला डेटा मिळवण्यात आला आहे.ऑफशोअर अकाउंटमध्ये म्हणजे विदेशी खात्यांमध्ये गुंतवणूक कशी करायची, याबाबत अॅपलबी कंपनी सल्ला देते. १८९० मध्ये बर्म्युडामध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या प्रकारची सेवा देणार्या कंपन्यामध्ये जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे.
Comment:ok