⁠
Study Material

परीक्षेच्या स्वरूपानुसार तयारी हवी!

Library-Booksपरीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केल्यास अभ्यासात नेमकेपणा येतो, जो गुण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो. परीक्षांचे दिवस जवळ आले आहेत.. बोर्ड परीक्षांचे, स्पर्धा परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे पडघम वाजू लागले आहेत. आज अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत वेगवेगळ्या चाचण्या आणि परीक्षा ही नित्याची बाब मानली जात आहे. काही अभ्यासक्रमांमध्ये एखादा पाठ शिकवल्यानंतर त्या विशिष्ट भागाची परीक्षा घेतली जाते. या चाचणीकडे शिकण्याचाच भाग म्हणून ग्राहय़ धरले जाते. काही अभ्यासक्रमांच्या एका सत्र परीक्षेत तुम्ही मिळवलेले मार्क पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी पुरेसे नसतात, तर अनेक चाचण्यांमधील तुमची कामगिरी एकत्रितपणे महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या स्वरूपांच्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतींनी सज्ज व्हावे लागते. कुठल्याही परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम प्रत्येक परीक्षेचे स्वरूप लक्षात घ्यायला हवे आणि त्यानुसार परीक्षेची तयारी करण्याचा आराखडा आखायला हवा.

अनेक अभ्यासक्रमांच्या, स्पर्धा परीक्षांच्या, प्रवेश परीक्षांच्या तसेच नोकरभरतीच्या परीक्षांचे स्वरूप साधारणपणे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा अथवा मुलाखत असे असते. लेखी परीक्षा ही दोन प्रकारची असू शकते- निबंधात्मक अथवा बहुपर्यायी. निबंधात्मक अशा लेखी परीक्षेत उत्तरे मोठी, छोटी अथवा त्रोटक अशा पद्धतीने लिहावी लागतात, तर बहुपर्यायी पद्धतीत तुम्हाला अचूक पर्याय शोधावा लागतो. बहुपर्यायी परीक्षा ही शाब्दिक अथवा अशाब्दिक प्रकारची असते. अशाब्दिक प्रकारच्या प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या आकृत्या अथवा चित्रांच्या रेखाटनातून विद्यार्थ्यांला आपली कामगिरी सिद्ध करावी लागते. या अशाब्दिक प्रकारात भाषिक कौशल्याला बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेची चाचणी होते. काही परीक्षांमध्ये वर्गीकरणाविषयीचेही प्रश्न असतात. मालिका, सारखेपणा, पूर्णत्व, जोडय़ा जुळवा, चूक/ बरोबर अथवा हो/नाही, शब्दांचा अथवा वाक्यांचा क्रम लावा, योग्य उत्तर द्या असेही प्रश्नांचे स्वरूप असते.
उमेदवारातील वेगवेगळ्या क्षमतांची चाचणी ही योग्य रीतीने रचना केलेल्या परीक्षेद्वारे केली जात असते. शालेय, महाविद्यालयीन आणि काही अंशी विद्यापीठीय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या सैद्धान्तिक ज्ञानाची चाचणी केली जाते. यात प्रामुख्याने भाषा, विज्ञान, मानव्यशास्त्रे याविषयीच्या ज्ञानाची चाचणी होत असते. नोकरभरतीदरम्यान उमेदवाराची निवड करताना लेखी परीक्षेद्वारे उमेदवाराची विचारक्षमता (लॉजिकल थिंकिंग) व आकलन तपासले जाते.

काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांमध्ये तसेच नोकरभरतीत विद्यार्थ्यांची अथवा उमेदवाराची कलचाचणी घेण्यात येते. प्रत्येक उमेदवारातील उपजत कौशल्य वेगवेगळे असते. कुणी चित्रकलेत प्रवीण असते, कुणाला गाण्यात गती असते, तर कुणी यांत्रिक कामामध्ये तरबेज असते. उमेदवारातील उपजत कौशल्याची चाचणी ही योग्य रीतीने योजलेल्या चाचण्यांवर अवलंबून असते. वास्तुशास्त्र (आर्किटेक्चर), फाइन आर्ट्स आणि डिझाइन याविषयीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेत मुख्य भर हा विद्यार्थ्यांच्या कलचाचणीवर असतो. कलचाचणीत प्रामुख्याने उमेदवाराची कौशल्ये आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुण हेरले जातात. यंत्रांचे छोटे-मोठे भाग तासन्तास हाताळण्याची क्षमता, झोकून देऊन काम करणे, डिजिटल ज्ञान, खिलाडूवृत्ती इत्यादी तुमच्या कौशल्याचा भाग ठरतो, तर आत्मविश्वास, आनंदीपणा, उल्हासी वृत्ती, संयम, बोलण्यातील मृदूपणा, कामात पुढाकार घेण्याची वृत्ती, सादरीकरण इत्यादी गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण तुमच्या करिअरमध्ये प्रभावी ठरत असतात.

तुम्ही देत असलेल्या परीक्षेत नेमक्या कशाची चाचणी होईल, हे लक्षात घेत तुम्ही परीक्षेची तयारी करायला हवी. ‘केवळ लेखी चाचणी आहे,’ असे म्हणत परीक्षेचे नेमके स्वरूप लक्षात घेतले नाही तर त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच त्या विशिष्ट परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांची काठिण्यपातळी आणि गुणदान पद्धती या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती असणे आवश्यक आहे तरच परीक्षेची तयारी योग्य दिशेने करता येईल.

हे साधारणपणे एखाद्या क्रीडा स्पर्धेत उतरताना कराव्या लागणाऱ्या तयारीसारखे आहे. म्हणजे तुम्ही १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उतरणार आहात, की १० हजार मीटरच्या शर्यतीत उतरणार आहात, यावर तुमच्या प्रशिक्षणाचे स्वरूप ठरत असते. या दोन्ही शर्यतींत एक सामायिक गोष्ट म्हणजे तुम्ही धावणार आहात; पण तरीही दोन्ही स्वतंत्र स्पर्धासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागते. तशाच प्रकारे तुम्ही नेमकी कुठली परीक्षा देणार आहात, त्यावर त्या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला हवी, हे ठरणे सयुक्तिक.

लेखी परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तुम्हाला अनेक निबंध लिहावे लागणार आहेत, प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत, उत्तरे त्रोटक स्वरूपाची आहेत की विस्तारित, तुम्हाला त्यात रेखाटने करायची आहेत का, गणिते येणार आहेत का, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांतून तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करावी, याचा पॅटर्न सापडू शकतो.

लेखी परीक्षेची तयारी ही वेगळ्या प्रकारची असते, तर प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी ही वेगळ्या पद्धतीने करावी लागते. तोंडी परीक्षा अथवा मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने स्वत:ला सिद्ध करावे लागते. अभ्यासक्रमांशी संबंधित तोंडी परीक्षा या अभ्यासाची तयारी जोखणाऱ्या असतात, तर स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरतीच्या निवडप्रक्रियेतील मुलाखती या तुमच्या व्यक्तिमत्त्वाची बलस्थाने हेरण्यासाठी असतात. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, त्यासाठी आवश्यक ठरणारी कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व तुमच्या ठायी आहेत का, याची चाचपणी मुलाखतीद्वारे होत असते.

एकूणच शिकताना आणि करिअरच्या नवनव्या टप्प्यांवर द्याव्या लागणाऱ्या परीक्षांना सामोरे जाताना त्या परीक्षेचे नेमके स्वरूप लक्षात घेणे उचित ठरते. त्यानुसार तयारी केल्यास यशाचा मार्ग अधिक प्रशस्त करता येतो.

(हा लेख अतुल कुमठेकर यांनी लिहला असून दैनिक लोकसत्तावरून साभार घेण्यात आला आहे.)

Related Articles

Back to top button