पोलिसाने कानाखाली मारल्यानंतर फळविक्रेता तरुण जिद्दीने बनला पोलीस उपनिरीक्षक
हातगाड्यावर फळविक्री करताना एका ट्राफिक हवालदाराने गालात चापट मारून गाडा रस्त्याच्या बाजूला हटवला. हे शल्य बोचल्याने संघर्ष करत आणि परिश्रम व जिद्दीच्या बळावर एका तरुणाने पोलिस दलात सहभागी होऊन चापटेचे उत्तर फौजदार बनून दिले. चाँद हमजा मेंढके असे यशाला गवसणी घालणा ऱ्या तरुणाचे नाव आहे. मागील आठवड्यात त्यांची पोलिस उपनिरीक्षपदी निवड झाली.
उस्मानाबाद शहरापासून आठ किलोमीटरवरील समुद्रवाणी हे चाँद हमजा मेंढके यांचे गाव. त्यांच्या कुटुंबाचा मूळचा व्यवसाय हा शेती. त्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. २००६ मध्ये ते ७४ टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाले. परंतु डीएडला नंबर लागला नाही. घरची परिस्थिती बेताची. परंतु पुढील शिक्षण घेण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यांनी उस्मानाबाद शहरात फळांचा गाडा सुरू केला. फळविक्रीचा व्यवसाय करत त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एके दिवशी रस्त्याच्या कडेला फळविक्रीचा गाडा लावला असता त्यावेळी एका ट्रॅफिक हवालदाराने चॉँद यांच्या गालात चापट मारून त्यांचा गाडा हटवला. येथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांचे ध्येय निश्चित झाले. त्यांनी पोलिस होण्याचा निश्चय केला होता. २००८ मध्ये झालेल्या पोलिस भरतीत त्यांना यश आले आणि ते पोलिस शिपाई झाले. २००८ ते १७ या कालावधीत ते उस्मानाबाद, उमरगा, भूम येथे पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. पोलिस म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासीठीची तयारी सुरूच ठेवली. मागील आठवड्यात त्यांची पोलिस उपनिरीक्षपदी निवड झाली. त्यांच्या या यशात जिद्द आणि धडपड महत्त्वाची ठरली.
MPSC Inspiring Stories वाचण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.