वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या दु:खातून सावरत; माधुरी चिकाटीच्या जोरावर बनली पोलीस अधिकारी
MPSC Success Story : प्रचंड कष्टमय जीवन आणि बऱ्याच अडचणींवर मात करत माधुरी माधुरी पाटीलला एमपीएससीच्या परीक्षेत मोठे यश मिळाले आहे. गेल्यावर्षी मध्यप्रदेशमध्ये माधुरीच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. अचानक पिताछत्र हरल्यामुळे आर्थिक व मानसिक स्थिती डगमगली. त्यामुळे तिच्या एकट्या भावावर शेतीच्या कामाचा भार पडला.
वेळप्रसंगी, माधुरीने देखील कुटुंबाला हातभार लागावा म्हणून शेतीच्या कामातही भावाला मदतही केली. पण तिने हे शेतीकाम करत असताना अभ्यासाची कास सोडली नाही. रोजचा अभ्यास आणि सराव चालू ठेवला. याच चिकाटीच्या जोरावर २०२० मध्ये पीएसआयची परीक्षा दिली आणि पोलीस उपनिरीक्षक पदावर मजल मारली.
माधुरी ही मूळची जळगावच्या अमळनेर तालुक्यातील वासरे गावाची आहे. आपली मुलगी पोलीस व्हावी, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी त्यांनी तिला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाठी प्रोत्साहन दिले. तिचे प्राथमिक शिक्षण हे वासरे गावातच केलं. तिने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कळमसरे येथून पूर्ण केले.पुढे प्रताप महाविद्यालयातून पूर्ण केलं.
त्यानंतर तिने नगाव येथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतले. पण तिने अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर न करता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडचणींच्या परिस्थितीवर मात करत स्वत:ला झोकून दिले. अचानक आपले पिता सोडून गेले याचा त्रास तिला अजूनही सतावतोय. पण तिने त्या दु:खातून स्वत:ला सावरतं पित्याचं स्वप्न साकार केले, याचे तिला समाधान नक्कीच आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नक्कीच यश मिळते हे माधुरीने दाखवून दिले आहे.
एमपीएससीच्या परीक्षेत आपण यशस्वी झालो हे वृत्त कळल्यानंतर माधुरी हिच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. खरंतर हे आनंदाचे अश्रू होते. आपण केलेल्या संघर्षाचं हे फळ आहे, असा विचार तिच्या मनात आला. तसेच यावेळी आपल्यासोबत आपले वडील असायला हवे होते. ते का नाहीत? या विचारांनी ती अस्वस्थ झाली. तिला आजही आपल्या वडिलांची आठवण येते. वडील आपल्यासोबत आज असायला हवे होते, असं तिला नेहमी वाटतं. तिला प्रत्येक क्षणाला आपल्या वडिलांची कमतरता जाणवत राहते.