⁠
Inspirational

झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेशची पोलिस उपनिरीक्षक पदी गवसणी; वाचा त्याच्या यशाची कहाणी

MPSC PSI Success Story : दहा बाय दहाची झोपडपट्टीतील खोली, अठरा विश्व दारिद्रय, वडील गवंडी कामगार आणि सोयी – सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितीत देखील निलेश बचुटे याने उच्च शिक्षण घेतले‌….इतकेच नाहीतर पोलिस उपनिरीक्षक पदी गवसणी घातली‌. वाचा, निलेशच्या कष्टाची ही यशोगाथा…

निलेशच्या वडिलांचे स्वप्न होते की, मुलाला चांगले शिकवायचे. पण त्यांच्या हाताशी गवंडी काम होते.त्याच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं गरजेचे आहे. त्यामुळे, त्यांनी मुलांना शिक्षणात खूप पाठिंबा दिला.गवंडी काम करत चार पैसेगाठीला बांधून निलेशला चांगलं शिक्षण दिले.भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीतील दहा बाय दहाच्या झोपडीत निलेश हा आई-वडीलांसह सात जण राहतात. निलेश हा लहानपणापासूनच हुशार असल्याने आई – वडिलांची त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. निलेश याच्या शिक्षणासाठी त्याचे आई-वडिलांनी अपार कष्ट केले आहे. काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे निलेशने सिध्द करून दाखविले आहे. कधीही परिस्थितीचा बाऊ न करता, येईल त्या परिस्थितीला सामोरे जात, लग्न कार्यात वेटरची नोकरी करत ध्येयाकडे वाटचाल करत निलेशने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

निलेशचे शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले आहे. बी.कॉम व एम.कॉम रामकृष्ण महाविद्यालयातून झाले आहे. घरात दोन वेळ खायची चणचण, असे दिवस काढलेल्या निलेशने मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच.मात्र अनेक छोटी-मोठी कामे करत अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले आहे.

शिक्षणाच्या निमित्ताने रस्त्यावरून जात असताना शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालये पाहून त्याला मनात कुठेतरी आपणही असेच उच्च अधिकारी व्हावे, असे वाटत होते. शैक्षणिक साहित्य विकत घेण्यासाठी आई-वडिलांकडून सतत पैसे मागणे हे त्याला पटत नव्हते. त्यामुळे तो लग्नामध्ये वेटरची कामे करत असत. आई-वडील कसे कबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत याची पूर्णपणे जाणीव निलेशला होती.त्याच्या मनात पहिल्यापासून खाकी वर्दीबद्दल खास आकर्षण होतेच. त्यामुळे त्याने त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तर मुलाखतसाठी निगडी येथील ओझर्डेज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा. भूषण ओझर्डे यांचे त्याला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले . प्रामाणिकपणे कष्ट केल्यास या जगात अशक्य असे काहीच नाही‌. शिक्षण घेत असताना पाहिलेले स्वप्न व आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज आज अखेरीस पूर्ण झाले आहे. निलेशचे पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली. लहानपणापासून दहा बाय दहाच्या झोपडीत अभ्यास करणाऱ्या निलेशने कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

Related Articles

Back to top button