PSI Success Story एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात वाढलेली, ग्रामीण भागात लहानाची मोठी झालेलीच, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या लामजना येथील शेतकऱ्याची मुलगी शीतल राजकुमार चिल्ले. शीतलची पीएसआय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
खरंतर शितलच्या आईचं स्वप्न होते पोलीस होऊन जनतेची सेवा करायचे. मात्र, पाच मुली अन् त्यात वडिलांचं अकाली झालेलं निधन. त्यामुळे आईचं लवकर लग्न झालं अन् तिचं पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं राहिलं. पण आता लेकीनं ते स्वप्न पूर्ण केले. तर तिच्या वडिलांना इच्छा होती की, आपल्या मुलीनं कृषी अधिकारी व्हावं. त्या क्षेत्राशी निगडित शिक्षण घ्यावं. पण शीतलने मेहनतीने यशस्वीरित्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि गावचा अभिमान वाढवला.
साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या शितलने लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे प्राथमिक धडे घेतले. तर औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिनं बीएचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान, तिनं राज्य लोकसेवेच्या परीक्षेची तयारी केली.पण ग्रामीण भागातील अनेक मुलांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण ग्रामीण भागातून आलोत, आपलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालंय. आपल्या पेक्षा इतर मुले खूप हुशार आहेत. यातून ते स्वतःचं खच्चीकरण करून घेतात.
शीतल या सगळ्या प्रवासात धाडसाने पुढे आली. सगळ्या परिस्थितीतूनही सामोरे गेली. एकदा ग्राउंडची तयारी करत असताना पाय मुरगळला. पायावर सूज आली. त्यामुळे आता आपण ग्राउंडमध्ये जातो की काय अशी भीती तिला वाटू लागली. मात्र काहीही झाले तरी आपण हार मानायची नाही, असा ठाम निर्धार तिने केला. तिची आजी रोज पायाची वेगवेगळ्या तेलाने मालिश करत राहिल्या.
आपल्या नातीला लवकर आराम मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत राहिल्या. देवाला नवसही बोलू लागल्या. आता नातीच्या यशाने त्या देखील आनंदी झाल्या आहेत. इतकेच नाही तर जेव्हा शीतल पीएसआय झाली, अन् साऱ्या गावानं या लेकीच्या यशाचा जल्लोषात आनंद साजरा केला.सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील या लेकीने गावची शान वाढवली.