MPSC Success Story : लहानपणापासून वर्दीचे स्वप्न असले की ते पूर्ण करेपर्यंत प्रयत्न करत रहावे, हा निश्चय तिने ठरवला.कोणताही महागडा क्लास न लावता शेतमजुराच्या मुलीने स्वत:च्या जिद्दीच्या बळावर MPSC परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. वंदना अविनाश गिरी असं या मुलीचं नाव आहे. ती धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे.
माळेगाव मक्ता येथील नागेंद्र गिरी हे शेतमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली असे अपत्य. वंदना सोडून इतरांचे शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंतचे. पण, वंदना लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे तिला शिकवण्याचा निर्णय नागेंद्र गिरी यांनी घेतला. वंदनाने गावातीलच जि.प. शाळेत प्राथमिक तर पंचपुरा माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले.
त्यानंतर वंदना हिने धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला क्लास लावणे शक्य नव्हते.
त्यामुळे, तिने कोणत्याही अकॅडमीकडे एकही दिवस क्लासेस न करता केवळ स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित केले. तिला चांगले माहिती होते की आपण जर मनापासून अभ्यास केला तर यश मिळेल. तिला वर्दीचे स्वप्न खुणावत होते. तसा तिने अभ्यास देखील केला. याच मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. ती देगलूर तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
तिच्या या यशाचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत आहे.
दरम्यान, MPSC ची पूर्व परीक्षा देत असताना वंदना गिरी यांची अन्वी ही मुलगी दोन महिन्यांची होती. पण, जिद्द उराशी बाळगून वंदना यांनी मुलीला घरी ठेवून परीक्षेसाठी माळेगाव येथून जालना गाठले आणि परीक्षा दिली. त्यानंतर मुलीला घरी ठेवूनच ग्राऊंडवर जाऊन सराव केला.