मी युपीएससी सीएसई परीक्षेच्या तयारीचे स्वरूप तुमच्यासमोर मांडत आहे. हे सर्वांनाच लागू राहील असे नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने अभ्यास सोयीस्कर करावा.
प्रथम एक गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यायला हवी, युपीएससी ही परीक्षा इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. युपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपाचा असून अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यवहार इत्यादी विषयांचा अभ्यास एकाचवेळी करताना घटना-घडामोडींची माहिती अद्ययावत ठेवावी लागते.
सुरवातीला स्वाभाविकपणे हा अभ्यासक्रम कठीण वाटतो पण मुळात तो तसा कठीण नाहीये, पण त्यासाठी तुम्ही प्रत्येक विषयात आवड निर्माण करायला हवी. स्वारस्य वाढवल्याने रटाळपणा जाऊन तुम्ही अभ्यासाचा आनंद घेऊ लागता आणि तुम्हाला अभ्यासाचे कुठलेही ओझे वाटत नाही.
मी वाजीराम आणि राव या संस्थेत अभ्यासाला सुरवात केली होती. सुरुवात करतांना तुमचा एनसीआरटीचा पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. याचा वास्तवदर्शी फायदा तुम्हाला अभ्यास सुरु करताना जाणवेल, किंवा एखाद्या संस्थेत तुम्हाला जेही शिकवण्यात येईल त्याबद्दल तुम्हाला आधीच कल्पना असेल.
‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्सप्रेस’ह्या वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा, दोघांपैकी कोणत्याही एकाचे वाचन करावे, दोनही वृत्तपत्रे एकाचवेळी वाचण्याची आवश्यकता नाही. साधने मर्यादित ठेवा. वाचताना तुम्ही नोट्स पण काढू शकता त्याचा नक्कीच फायदा होतो.
मी माझ्या ७ वर्षे जुन्या लॅपटॉप आणि इंटरनेटवर खूप अवलंबून होतो. मी पुस्तकांचा कमीत कमी वापर केला. प्रथम वाचनासाठी मी पीडीएफ पुस्तकांचा वापर करून महत्वाचे मुद्दे अधोरेखित करून ठेवले होते, याचा उपयोग सराव करताना होतो.
सराव…! सराव….! सराव….! सराव हा नेहमी आधी वापरलेल्या साधनांतूनच करावा. कधीकधी राज्यसभा टीव्हीसारख्या दुरचित्रवाणी वरील वादविवाद बघावेत, त्याठिकाणी खरे प्रशासक बघायला मिळतात. त्यातून तुम्हीही प्रशासकासारखा विचार करायला शिकातात.
जेवढे जास्त लिहिता येईल तेवढे जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासाच्या विषयात लिहिताना तल्लीन होत जाणे व आकलनक्षमतेचा पुरेपूर वापर होणे, तुमचा ताण हलका करणारे ठरते. मी 2011 साला पासून indianfooty.com या संकेतस्थळावर ब्लॉगिंग करतो आणि लिखाणाचा खरोखर आनंद घेतो. लिखाणाची मदत तुम्हाला युपीएससीच्या मुख्य परिक्षेसाठी व मुलाखतीमध्ये भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी होतो.
अभ्यासक्रमाकडे बघून घाबरून जाऊ नये. तुम्ही पायाभूत एनसीआरटी पुस्तकांचा अभ्यास पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल बोजडपणा वाटणार नाही. तुमच्या आणि माझ्यासारखेच लोक युपीएससी उत्तीर्ण होतात त्यासाठी खूप असामान्य बुध्दीमत्ता असण्याची गरज असते असा न्यूनगंड सर्वात आधी मनातून काढून टाका.
(Quora या संकेतस्थळावरील प्रश्नाला, सोमेश उपाध्याय यांनी दिलेल्या उत्तरातून अनुवादित)