भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डबल धमाका केला. मोहालीत सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये चौकार षटकारांची बरसात करत रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे आणि श्रीलंकेविरुद्धचे दुसरे द्विशतक फटकावले. या खेळीदरम्यान रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली. 115 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर रोहितने टॉप गिअर टाकला. मग पुढच्या 100 धावांसाठी मात्र त्याने अवघे 36 चेंडू घेतले. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले. 2013 मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी साकारली होती. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. रोहित शर्माने 264 धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
मोहालीत रोहित शर्माने नोंदवलेले विक्रम पुढीलप्रमाणे
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके फटकावणारा एकमेव फलंदाज.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध दोन द्विशतके फटकावणारा एकमेव फलंदाज.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावणारा दुसरा कर्णधार, याआधी वीरेंद्र सेहवागने अशी कामगिरी केली होती.
कर्णधार म्हणून आणि कर्णधार नसतानाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके फटकावणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये फटकावल्या गेलेल्या 7 द्विशतकांपैकी तीन रोहित शर्माने फटकावली, तर एकूण पाच द्विशतके भारतीयांच्या नावे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 वेळा दीडशेहून अधिक धावा फटकावण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी रोहित शर्माची बरोबरी.
रोहितची एकदिवसीय क्रिकेटमधील षटकारांची संख्या 158 वर त्याबरोबरच महेंद्र सिंग धोनी (213), सचिन तेंडुलकर (195), सौरव गांगुली (190) यांच्यानंतर वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर.