भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रखमाबाई राऊत यांची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी 153 वी जयंती असून त्यानिमित्त गूगलने डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि 17 व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झालं. जयंतीबाई अवघ्या 17 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं. आईप्रमाणेच रखमाबाई यांचाही बालविवाह झाला. रखमाबाईंचा वयाच्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी विवाह झाला. मात्र त्यांनी माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण घेतलं. मार्च 1884 मध्ये दादाजी यांनी मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून मागणी केली. त्यावेळी, दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा, असे कोर्टाने सांगितलं. अर्थात, रखमाबाईंनी तो निर्णय नाकारला आणि न्यायालयीन लढाई दिली. पुढे हाच खटला लँडमार्क ठरला आणि 1891 मध्ये एज ऑफ कॉन्सेन्ट अॅक्ट अस्तित्त्वात आला. रखमाबाईंनी सुमारे 35 वर्षे यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. वयाच्या 91 व्या वर्षी रखमाबाई राऊत यांचं निधन झालं.