लेखक – संदीपकुमार साळुंखे, IRS, अतिरिक्त आयकर आयुक्त.
( सरांची “धडपडणाऱ्या तरुणाईसाठी”; “अंतरीचा दिवा”; “हम होंगे कामयाब”; “उठा जागे व्हा”; ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय राज्यसेवा मुख्यपरीक्षा जैवतंत्रज्ञान घटक यासाठी डॉ. मोनाली संदीपकुमार साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे संपादन सरांनी केलेले आहे.)
पुण्यात अडकलेल्या, मुख्यतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना आपल्या गावी परत घेऊन जाणाऱ्या गाड्यांची बातमी टीव्हीवर पाहिली आणि मनापासून आनंद झाला. चुकीच्या कारणाने का होईना पण एका न संपणाऱ्या दुःखातून तरुणांची सुटका होत आहे की काय असा भास झाला. अशा सर्व मित्रांना माझे सांगणे आहे की मुळात पूर्व परीक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे, तसेच यापुढे कदाचित लवकर मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार नाहीत अशा बातम्या सर्वत्र प्रसारित होत असल्यामुळे तुमच्या मनात निराशा, अनिश्चितता आणि संभ्रम निर्माण झाला असेल यात शंकाच नाही. पण तरीही खचून जाऊ नका. जे होते ते चांगल्यासाठीच होते असा विश्वास बाळगा.
साधारणतः महिन्याभरातच तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थित नियोजन केले तर घरीसुद्धा अभ्यास होऊ शकतो. त्यासाठी मोठ्या फी भरून, मेसमध्ये निकृष्ट खाऊन, एखाद्या १० बाय १० च्या रूममध्ये ३-४ जण कोंडवळ्यासारखे किंवा खुराड्यासारखे राहून, आपल्या आई-बापांना कर्जबाजारी करून, त्यांना बकऱ्या, बैल नाहीतर शेतीचा तुकडा विकायला लाऊन मोठ्या शहरांमध्ये राहायची अजिबात गरज नाही.
मी स्वतः MPSC आणि UPSC अशा दोन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेलो आहे आणि तेही पूर्णवेळ नोकरी करून. दोन आठवड्यातून केवळ एक दिवस मी टिळक रोड सदाशिव पेठेकडे जायचो, मित्रमंडळींना भेटायचो, काही नवीन नोट्स किंवा पुस्तके आली असल्यास घ्यायचो आणि परत येऊन पुन्हा पुढचे पंधरा दिवस दहा तासाची ड्युटी करून उरलेल्या वेळात अभ्यास करायचो. अत्यंत कमी वेळ अभ्यासाला मिळत असल्यामुळे मी अनेक युक्त्या करून अभ्यास करायचो. उदाहरणार्थ, महत्वाचे टॉपिक टेपवर रेकॉर्ड करून सकाळी ब्रश, आंघोळ वगैरे प्राथमिक विधी करण्याच्या 40 मिनिटांच्या काळात मोठ्या आवाजात टेप लावून द्यायचो, महत्वाच्या नोट्सच्या, पुस्तकांच्या खिशात मावतील अशा छोट्या झेरॉक्स करून कंपनीत लंच ब्रेक मध्ये पाच मिनिटात जेवण आटोपून उरलेल्या अर्ध्या तासात खिशातील त्या नोट्स वाचायचो, रात्री मेसमध्ये जेवताना रेकॉर्ड केलेल्या कॅसेट वॉकमन मध्ये टाकून हेडफोन लाऊन ऐकायचो. इतरांना वाटायचे की मी गाणी ऐकत आहे, प्रत्यक्षात मात्र मी माझ्याच आवाजातल्या नोट्स ऐकत बसायचो. माझ्या “हम होंगे कामयाब” या पुस्तकात मी नोकरी करत असताना अभ्यास कसा करायचा यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहीले आहे. ही २००१-२००४ यादरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळी स्मार्टफोन्स फारसे चलनात नसल्यामुळे walkman आणि कॅसेटचा वापर करायचो.. आता तर तुमच्याकडे स्मार्टफोन्स आहेत आणि इंटरनेट देखील आहे त्यामुळे ठरवले तर तुमच्या सगळ्यांसाठी या गोष्टी खूप सोप्या आहेत.
अर्थात मला पर्याय नव्हता म्हणून मी तसे करत होतो आणि तुम्ही देखील असेच केले पाहिजे असा माझा आग्रह नाही परंतु प्राप्त परिस्थितीत तुम्हाला आधार वाटावा म्हणून मी हे सांगत आहे. तुमच्याकडे महत्त्वाची पुस्तके आणि नोट्स सोबत असतीलच. शिवाय अनेक विषयांवर तुम्हाला युट्युब आणि विविध वेबसाइट्स, व्हाट्सअप ग्रुप आणि इतर सोशल मिडीयाद्वारे सर्व माहिती अद्यावत स्वरुपात मिळतेच. त्यामुळे आपला काही अभ्यास राहून जाईल अशी भीती मनात बाळगू नका. मुख्य म्हणजे फोमो (FOMO – Fear of Missing Out) म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळणार नाहीत किंवा आपण मागे राहून जाऊ ही भीती मनातून काढून टाका. ही सर्व भीती केवळ निर्माण केलेली असते. शिवाय आता सर्वचजण आपापल्या घरी अभ्यास करत आहेत त्याच्यामुळे सर्व एकाच पातळीवर आले आहेत हे लक्षात ठेवा.
प्रत्यक्षात आता स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांचे स्वरूप असे आहे की तुम्हाला जर मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे intelligent guessing म्हणजे बुद्धिधारित अंदाजाने तसेच एलिमिनेशन पद्धतीने देता येतात. नुसत्या माहितीवर आधारित प्रश्नांचे स्वरूप आता बरेच कमी झाले आहे. त्यामुळे खूप भारंभार आणि डझनावारी पुस्तके वाचण्यापेक्षा मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारी, अद्ययावत माहिती असणारी अशी निवडक पुस्तकेच वाचा. खूप पुस्तके एकेकदा वाचण्यापेक्षा निवडक आणि महत्त्वाची पुस्तके अनेकदा वाचा. आपण मागे राहून जाऊ या भीतीला घालवण्यासाठी आपापल्या मित्र-मैत्रिणींचे फक्त अभ्यासासाठीचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यात अभ्यासाव्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा होणार नाही असे नियम बनवा, म्हणजे तुम्हाला एकत्र अभ्यासिकेत बसल्यासारखी किंवा गटचर्चा केल्यासारखी फिलिंग येईल. ज्या तरुणांची गावाकडची घरे छोटी असतील किंवा घरात अभ्यासाचे वातावरण नसेल त्यांनी एखादी तात्पुरती अभ्यासिका गावात तयार करा किंवा सरळ सरळ आपल्या किंवा मित्राच्या शेतावर जाऊन मस्त झाडाखाली किंवा गावाबाहेरच्या एखाद्या मंदिरावर अभ्यास करा. सध्या दोन-तीन महिने शाळाही बंद असणार आहेत त्यामुळे गावातल्या वरिष्ठांना विनंती करून तुम्ही शाळेतल्या एखाद्या खोलीत देखील अभ्यासिका तयार करू शकतात.
ज्या तरुणांना पार्टटाईम, अर्धवेळ नोकरी किंवा व्यवसाय करणे शक्य असेल त्यांनी तो जरूर करा. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की *पूर्णवेळ अभ्यास करणार्यांचा सुद्धा दिवसातून बराच वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यामध्ये जातो आणि शेवटी अभ्यास पाच-सहा तासच होतो. तुम्ही जर शेतातली कामे किंवा छोटा-मोठा व्यवसाय, एखादी अर्धवेळ नोकरी केली तर उलट तुम्ही उरलेल्या वेळात अधिक जास्त तन्मयतेने अभ्यास कराल आणि पुन्हा स्वतःला आणि कुटुंबाला थोडा आर्थिक आधार देखील मिळेल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळी आपण पूर्णवेळ अभ्यास करत असतो आणि आपली घरची परिस्थिती फारशी उत्तम नसते त्यावेळी मनात एक टोचणी सतत लागलेली असते की मी घराला काहीही आधार न देता पूर्णवेळ अभ्यास करत आहे. शिवाय स्पर्धा परीक्षांचे स्वरूपच असे आहे की कितीही जीव ओतून अभ्यास केला आणि कष्ट केले तरी शंभर टक्के यश मिळेलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपण एखादी अर्धवेळ नोकरी किंवा व्यवसाय करून अभ्यास केला तर ही टोचणी मनाला लागून राहत नाही. मात्र उरलेल्या वेळात अगदी तन्मयतेने अभ्यास करायचा ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा.
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता परीक्षा कधी होईल ? नवीन जाहिराती कधी येतील ? वगैरे.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सर्व देश आणि त्यातही महाराष्ट्र हा अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे त्यामुळे शासनाला आपले प्राधान्यक्रम नक्कीच बदलावे लागतील. मोठ्या प्रमाणावर रोजगार ज्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध होईल अशा क्षेत्रांवर जास्त भर द्यावा लागेल. शिवाय साथीच्या निवारणासाठी आरोग्य क्षेत्र, औषध निर्माण क्षेत्र, यावर भर द्यावा लागेल त्यामुळे कमी पदे भरली जाणे किंवा जाहिराती उशिरा येणे याबाबतीत आपण आपली मानसिक तयारी ठेवली पाहिजे. अशावेळी आपण पूर्णवेळ अभ्यास करण्याऐवजी अर्धवेळ अभ्यास केला आणि जाहिरात आल्यानंतर पुन्हा पूर्णवेळ अभ्यासाकडे वळलो तर आपली दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील. असो. ह्या पोस्ट मध्ये जास्त लिहत नाही लवकरच या बाबतीत अजून सविस्तर मार्गदर्शन करणारा एखादा व्हिडिओ तयार करून युट्युब वर पोस्ट करेल.
तुम्हाला सर्वांना उज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा.