ग्रामीण भागातील सीमा शेखचे MPSC परीक्षेत घवघवीत यश, राज्यात मुलींमध्ये अव्वल

MPSC Success Story अलीकडे मुलीही जिद्दीने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आहेत. अशातच नुकताच MPSC कडून वनसंरक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बीडमधील सीमा शेख हिने घवघवीत यश संपादन केले आहे.

सीमा हिने सर्वोत्तम कामगिरी करत राज्यात मुलींमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. त्यामुळे ती वनअधिकारी झाली असून शासकीय सेवेत कार्यरत होण्याचे तिचे स्वप्न साकार झाले आहे. सीमा शेख हिने केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ही त्रिसूत्री आवश्यक मानली जाते. बीड जिल्ह्यातील मादळमोही सारख्या ग्रामीण भागातील कन्या असणारी सीमा वनअधिकारी झाली असून ती मुलींमध्ये राज्यात अव्वल आली आहे.

मादळमोही या गावातील रहिवासी असलेल्या सीमा शेख हिचे वडील पेशाने डॉक्टर असून तर आई गृहिणी आहेत. पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लातूरमध्ये प्रवेश घेतला. बीएससीची पदवी संपादन केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

वडील पेशाने डॉक्टर असल्याने मुलीनेही डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, मामा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांच्याकडून वारंवार मार्गदर्शन मिळत होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतच यश मिळवून अधिकारी होण्याची इच्छा होती. कुटुंबातील सर्वांच्या प्रोत्साहनामुळे आज हे यश मिळवू शकले, असे सीमा शेख सांगतात.

सीमा वनअधिकारी झाली असून शासकीय सेवेत कार्यरत होण्याचे तिचे स्वप्न साकार झाले आहे. सीमा शेख हिने केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.