अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेत असतात. काहींना यात यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा.. दरवर्षी MPSC परीक्षेतून अनेक विद्यार्थी पास होतात. त्यात काही विद्यार्थी असे असतात ते परिस्थितीशी न हारता यश मिळवितात. पण तुम्ही लावणी कलाकार कधी महिला कधी पोलीस अधिकारी झाल्याचे ऐकले नसेल. मात्र, एका तरुणीने हा थक्क करणारा प्रवास पूर्ण करून दाखवलाय. सुरेखा कोरडे यांनी हे शक्य करुन दाखवलंय.
सुरेखा कोरडे यांनी पोलीस अधिकारी पदाला गवसणी घातली. सुरेखा कोरडे यांचं सुरुवातीचं शिक्षण हे औंधमधील कस्तुरबा गांधी वसाहत इथे झालं. त्यांचे वडील पीएमटी ड्रायव्हर होते. तर आई धुणीभांडीचं काम करत. घरात पाच मुली, घरची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. परिवाराला आर्थिक हातभार लागेल म्हणून सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. तसेच थोडेसे पैसे मिळतील या दृष्टिकोनातून लावणी करायला सुरुवात केली.
असा सुरु झाला नृत्याचा प्रवास….
आपण नृत्याकडे कसे वळलो याची आठवण सांगताना सुरेखा कोरडे यांच्या डोळ्यासमोरून ते दिवस उभे राहतात. दहावीत असताना कराटेच्या स्पर्धेसाठी सुरेखा यांना काठमांडूला जायचं होतं. पण त्यासाठी 9 हजार रुपये फी भरायची होती. आता फी भरण्यासाठी तर पैसे नव्हते. मग त्यांना एका (MPSC Success Story) नृत्य स्पर्धेची जाहिरात कळाली. त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला, फक्त सहभागच नाही तर त्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यावेळी 12 हजार रुपये बक्षीसाची रक्कम त्यांना मिळाली. याच रकमेतून त्यांनी काठमांडूच्या कराटे स्पर्धेत भाग घेतला आणि सिल्व्हर मेडल जिंकलं. आणि इथूनच सुरेखा कोरडे यांच्या नृत्याच्या करिअरला सुरवात झाली.
परंतु आई-वडील आणि समाज हा नेहमीच या लोककलेकडे वाईट नजरेने बघतो. त्यामुळे वडिलांचा सुरुवातीला खूप विरोध होता. त्यानंतर घरूनच विरोध असल्यामुळे समाजातले लोक खूप काही बोलायचे. पण आवड म्हणून त्यांनी वडिलांना न सांगता लावण्यखणीचे अनेक शो केले. त्यानंतर एक दिवशी वडिलांनी त्यांना अट घातली, की जर तु पुढचं शिक्षण घेतलं, तर आम्ही तुला लावणी करायला परवानगी देतो. यानंतर त्यांनी ती अट मान्य केली आणि लावणीच्या आवडीसाठीच त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेखा कोरडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी लावण्यखणीचे प्रयोग सुरूच होते. त्याचबरोबर दिवसभर नृत्य आणि रात्री अभ्यास असा प्रवास सुरु होता. त्यांच्या लावणीच्या प्रमुखांनी सुरेखासाठी प्रवास करणाऱ्या त्यांच्या गाडीमध्ये अभ्यासाची खास सोय करून दिली होती.
कलेचं क्षेत्र असं आहे की प्रत्येक कलाकाराला या क्षेत्रामध्ये चांगले वाईट अनुभव येत असतात आणि यातूनच हे मोठे कलाकार घडत असतात. परंतु काही ठिकाणी त्यांना थोडेसे वेगळे अनुभव आले. यातूनच त्यांनी निर्णय घेतला की आपण हे किती दिवस करणार, या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत. एका मर्यादेपलीकडे आपण लावणी कलाकार असो किंवा नसो, पण जर आपण एमपीएससी केलं, तर अधिकारी म्हणून मात्र शेवटपर्यंत असू या उद्देशाने आणि आई-वडिलांना समाजामध्ये मान मिळावा, समाजाने त्यांना हिणवू नये, या उद्देशाने त्यांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली.
२०१० एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी त्यांनी दोन महिने सदाशिव पेठमध्ये राहून अभ्यास केला. या परिक्षेत त्या पासही झाल्या. त्यांची पहिली पोस्टिंग कळंबोली पोलीस स्टेशनला झाली. आज त्या गुन्हे अन्वेषण शाखेत एक यशस्वी अधिकारी म्हणून काम करता आहेत.