माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ठ करण्यात आली. मुंबईच्या माजगाव डाकयार्डमध्ये नरेंद्र मोदींनी ही पाणबुडी नौदलाला समर्पित केली. यावेळी भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा, वाइस अॅडमिरल गिरीश लूथरासहीत अनेक अधिकारी उपस्थित होती. यावेळी मोदी म्हणाले की, 21व्या शतकाचा मार्ग हिंदी महासागरातूनच जाणार आहे.
फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प माझगाव गोदीत सुरू आहे. फ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता. या करारानुसार २०१३ साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर पहिली पाणबुडी नौदलात दाखल झाली. त्यापैकी कलवरी आणि खंदेरी या दोन पाणबुड्या नौदलाकडे या वर्षी सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता तब्बल १२० दिवसांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर, कलवरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे, तर खंदेरीच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. कलवरी पाणबुड्याच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. २०२१ पर्यंत स्कॉर्पियन श्रेणीतील उर्वरित पाणबुड्या नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.