अभिमानास्पद बाब; निफाडच्या लेकाची दुसऱ्या प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत गरूड भरारी!
UPSC Success Story : आपली परिस्थिती कोणतीही असली तरी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मात्र हवी. तशीच जिद्द आणि चिकाटी निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी दाखवली.
अविष्कार चे शिक्षण हे निफाडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण हे वैनतेय विद्यालयामध्ये झालेले आहे. आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत त्याने प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या हुशारीमुळेच त्याने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्याने पुणे गाठले. यूपीएससीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी त्याला पुणे येथील अवीनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले तर पुढील अभ्यास त्याने दिल्ली येथे राहून पूर्ण केला. भौतिक शास्त्रातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून केंद्रीय लोकसेवा परीक्षेमध्ये त्याने मानव वंश शास्त्र हा विशेष विषय निवडलेला होता.केवळ शैक्षणिक गोष्टीतच नव्हे तर क्रीडा आणि संगीत या विषयात देखील त्याला रुची आहे.
खोखो खेळामध्ये त्याने निफाडच्या संघाचे नेतृत्व राज्यस्तरापर्यंत केलेले आहे. तर संगीत क्षेत्रामध्ये त्याने संगीत विशारद ही देखील पदवी मिळवलेली आहे. सर्वगुणसंपन्न अशा निफाड सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेणारा विद्यार्थी राज्यस्तरावर आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून आयएएस परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल आविष्कार डेरले याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांकावर येण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे फक्त दुसऱ्या प्रयत्नात त्याने ही गरुड भरारी घेतली आहे.