UPSC Success Story स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा आणि प्रत्येकाचा यशाचा मंत्र वेगळा असतो. यातील प्रवास देखील नेहमीच वेगळा आणि आव्हानात्मक असतो. यात काही जण जास्त वेळ अभ्यास करतात आणि उत्तीर्ण होतात तर काही कमी वेळ अभ्यास करूनही उत्तीर्ण होतात. हरियाणातील देवयानी सिंगची यशोगाथा खरोखरच विलक्षण आहे. तिने आठवड्यातून फक्त दोन दिवस व्यवस्थित अभ्यास केला आणि युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच या परीक्षेत सरकारी पद मिळवले.
देवयानीचे शालेय शिक्षण हे चंदीगड येथे झाले. तेथेच त्यांनी बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर २०१४ मध्ये पिलानीच्या गोवा कॅम्पसमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. याच दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करताना देवयानीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.२०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये सलग अपयशी होऊनही तिने हार मानली नाही. ती मेहनतीने पुढे गेली.
अखेर, २०१८ मध्ये तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यात तिने २२२वा क्रमांक पटकावला . तिची केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाली. पण तिला अजून चांगले पद पाहिजे होते. म्हणून, तिने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसह प्रशिक्षणाचा समतोल साधत अभ्यास चालू ठेवला. ती आठवड्यातून फक्त दोन दिवस मनापासून अभ्यास करायची. त्यामुळे तिचे २०१९ मध्ये आयआरएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तसेच ती ११व्या क्रमांकासह उत्तीर्ण झाली.