महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना आज (१३ नोव्हेंबर) त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (१९१७-२०१७) अभिवादन. वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात १३ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. वसंतदादांनी १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८ आणि नंतर २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५ या कालखंडात ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले. १९८५ ते १९८७ या काळात ते राजस्थानचे राज्यपाल राहिले. १ मार्च १९८९ रोजी वसंतदादांचे मुंबईत निधन झाले. वसंतदादा सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिक प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार होते. त्यांनी राज्याला प्रगतीकडे नेणारे निर्णय घेतले. दादांनी आपल्या काळात महाराष्ट्राला एक संस्थात्मक राज्य बनविले. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही त्यांत वसंतदादांचे मोठे योगदान आहे. पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचे शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला. त्याचमुळे महाराष्ट्र आज शिक्षण, सहकार, शेती क्षेत्रात अग्रेसर आहे.वसंतदादा यांचे पुर्ण नाव वसंतदादा बंडूजी पाटील होत. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकर्यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वत:शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकर्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.
वसंतदादा पाटील यांच्या नावाच्या संस्था –
वसंतदादा पाटील साखर कारखाना
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (आधीचे नाव डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट), वाकडेवाडी (पुणे)
डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन, शुक्रवार पेठ (पुणे)
पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज फ आर्किटेक्चर, पिरंगूट (पुणे)
वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, सायन (मुंबई)
वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, बुधगाव (सांगली)
वसंत दादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज, रहिमतपूर
वसंतदादा पाटील यांनी भूषविलेली पदे –
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५)
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२)
साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते.
राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते कैक वर्षे अध्यक्ष होते
माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७).
१९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले.
१९७१ मध्ये अमेरिकेतील लुइझिना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले.