राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदारांची मुदत येत्या वर्षात संपत आहे. विधान परिषदेची या वर्षात मुदत संपणा-यांत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे विधानसभा सदस्यांमधून निवडून येणारे ११ सदस्य, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रातून निवडून देण्यात आलेल्या राज्य सभेच्या सहा खासदारांमध्ये वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. विधानसभेतून निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता आहे. विधान परिषदेच्या एक जागेची पोट निवडणूक ७ डिसेंबर रोजी होणार आहेत. तर दुसरा टप्पा जुलै महिन्यात येणार आहे. नाशिक, लातूर-उस्मानाबाद-बीड, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे.
निवृत्त होणारे विधान परिषदेतील सदस्य
सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, निरंजन डावखरे, जयंत जाधव, बाबाजानी दुरार्णी, अनिल तटकरे (राष्ट्रवादी), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, दिलीप देशमुख (काँग्रेस), भाई गिरकर, महादेव जानकर, प्रवीण पोटे, मितेश भांगडिया (भाजप), अनिल परब आणि डॉ. दीपक सावंत (शिवसेना), कपिल पाटील (लोकभारती), जयंत पाटील (शेकाप), अपूर्व हिरे (अपक्ष) असे २१ आमदार निवृत्त होत आहेत.