महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २३) जाहीर झाला. या परीक्षेत जळगावच्या तरुणाने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक मिळविला. विशाल सुनील चौधरी (२६) असे या तरुणाचे नाव आहे. विशाल याला 302 गुण मिळाले आहे. तर STI परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये त्याने 8 वा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण शहरात कौतुक होत असून सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
विशाल चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निमगाव येथे तलाठी म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. विशाल यांचे वडील सुनील भाऊराव चौधरी पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरीच वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत विशाल यांनी हे यश मिळविले आहे. चाळीसगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर जळगावात मु.जे. महाविद्यालयात बारावी तर पदवीचे शिक्षण नूतन मराठा महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केले आहे.
पदवीचे शिक्षण घेत असतानाच युपीएससीचा अभ्यास सुरु केला होता. मात्र त्यातील पद्धत जमत नसल्याने 2017 पासून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. घरीच आपल्या पद्धतीने पुस्तके आणून हा अभ्यास केला. 2018 मध्ये युपीएससीद्वारे घेण्यात आलेली असिस्टंट कमांडरची परीक्षा दिली होती. ही परीक्षा उत्तीर्ण देखील केली मात्र मुलाखतीत काही गुणांनी नोकरी हुकली. पुढे एमपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. 2019 मध्ये गट – क ची टॅक्स असिस्टंट जीएसटी विभाग, मंत्रालय लिपिक आणि तलाठी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि तलाठीची नोकरी स्वीकारली.
2020 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाल्यानंतर दोन महिन्यातच कोरोना आला आणि अभ्यासाला ब्रेक लागला. मात्र वर्षभरानंतर आठवड्यातून एक-दोन दिवस जसे जमेल तसा अभ्यास केला. तणाव घेऊन, नोट्स काढून अभ्यास केला तर तो जमत नाही. त्यामुळे आपल्याला हवं तस तणाव विरहित राहून अभ्यास केला. कोणत्याही नोट्स यासाठी काढल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.