भारतातून गव्हाची पहिली खेप अफगाणिस्तानमध्ये रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी पोहोचली आहे. विशेष म्हणजे यासाठी पाकिस्तानी जमिनीचा वापर करण्यात आलेला नाही. इराणच्या चाबहार पोर्टच्या मार्गाने भारतातून पहिल्यांदाच समुद्री मार्गाने सामान अफगाणिस्तानला पाठवण्यात आले आहे. या माध्यमातून भारत-अफणिनिस्तानदरम्यान चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी चाबहार पोर्ट ऑपरेशनलचा मार्ग मोकळा होणार आहे.अफगाणिस्तानसोबत रस्ते मार्गाने होणार्या व्यापार धोरणात पाकिस्तान अडचण ठरत होता. त्यामुळेच इराणमधील चाबहार पोर्ट भारत विकसित करत आहे. त्यासाठी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात इराण दौर्यात चाबहार पोर्टसह अफगाणिस्तानसाठी वाहतूक आणि ट्रेड कॉरिडॉरसाठी त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानुसार चाबहार बंदराला तिन्ही देशातील व्यापाराचे मुख्य केंद्र बनवण्याचे ठरले आहे. यामुळे सेंट्रल आशिया आणि युरोपसाठी भारतातून शिपमेंट पाठवण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही अर्धाने कमी होणार असल्याचा अंदाज आहे. चाबहार पोर्टला चीनच्या वतीने पाकिस्तानमधील विकसित करण्यात येत असलेल्या ग्वादर पोर्टला उत्तर म्हणून पाहिले जात आहे. चाबहार पोर्टसाठी इराणसोबत २००३ मध्ये चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याचे काम टाळले जात होते. यादरम्यान अमेरिका आणि इराणदरम्यान तणावामुळे पुन्हा एकदा चाबहार पोर्टच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, अलीकडेच भारताच्या दौर्यावर आलेले अमेरिकी विदेश मंत्री रॅक्स टिलरसन यांनी इराणसोबतच्या वैध व्यापारावर अमेरिकेला आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले होते.