मराठी साहित्य आणि समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना अमेरिकेतील मराठी माणसांच्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार, तर परभणी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
१३ जानेवारीला अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे हे पुरस्कार प्रदान केले जातील. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काम करणाऱ्या अरविंद गुप्ता यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अन्य पुरस्कारप्राप्त मान्यवर –
- सई परांजपे लिखित ‘सय : माझा कलाप्रवास’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार (२५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
- कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार (२५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
- अजित दळवी यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाला रा. शं. दातार नाट्य पुरस्कार (२५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
समाजकार्य पुरस्कार –
- चेतना गाला सिन्हा (म्हसवड, सातारा) यांना असंघटित कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कार्यासाठी पुरस्कार
- रुबिना पटेल (नागपूर) यांना मुस्लिम महिलांमध्ये केलेल्या प्रबोधनासाठी पुरस्कार
- अरुण जाधव (जामखेड, अहमदनगर) यांना भटके विमुक्त व दलित यांच्यासाठी केलेल्या संघर्षासाठी पुरस्कार
पुरस्कार प्रत्येकी ५० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचे आहेत.