कष्टाचं चीज झालं ! बस स्टॅंडवर पाणी विकणारा बनला ‘आरटीओ’ ऑफिसर

Published On: एप्रिल 29, 2022
Follow Us

बस स्टॅंडवर पाणी विकणाऱ्या तरुणाने एका महिन्याच्या अंतराने चक्क २ महत्वाच्या पदांना गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणाच्या जोरावर आवसे वस्ती आमराई या झोपडपट्टी भागातील अभिजीत अनिल नरळे या तरुणाने सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि ज्युनिअर अभियंता अशी या दोन महत्वाची पदाला गवसणी घातली असून त्यापैकी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदाला त्याने पसंती दिली आहे.

अभिजित याचा जन्म २५ सप्टेंबर १९९६ रोजी आवसे वस्ती या झोपडपट्टी भागात झाला आहे. वडील अनिल नरळे हे नरसिंग गिरजी मिलमध्ये काम करत होते. आई गृहिणी आहे. गिरणी बंद पडल्यानंतर वडिलांनी सोलापूर बसस्थानकावर पाणी बाटली विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अभिजीतसुद्धा त्यांना मदत करायचा. तर आईने बीएससीपर्यंत शिक्षण असूनही कपडे आणि बांगड्या विकून अभिजितसह सर्व मुलाबाळांना शिक्षित केले. अभिजितला एक मोठा भाऊ तर दोन बहिणी आहेत. एक बहीण एमटेक तर दुसरी पुण्यात बँकेत नोकरी करते. अभिजितचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आमराई येथील महात्मा बसवेश्वर प्रशालेत तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नॉर्थकोट प्रशालेत झाले आहे.

बीएमआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर त्याला तुळजापूर येथील जलसंपदा विभागात शासकीय सेवेत नोकरी लागली. तेथे ५ महिने सेवा केली. पुढे रेल्वेच्या लोको पायलट पदासाठी नोकरी करायची म्हणून अभिजीतने जलसंपदा विभागातील नौकरीचा राजीनामा दिला. लोकोपायलटसाठीच्या सर्व परीक्षेत अभिजीत पास झाला. मात्र, चष्मा असल्याने त्याने ती नोकरी सोडली.

त्यानंतरही अभिजीत याची चिकाटी कायम राहिली. वडिलांना व्यवसायात मदत करत आणि मिळेल त्या वेळेत अभ्यास करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १५ मार्च २०२० रोजी पूर्वपरीक्षा दिली. तर २० नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यात मुख्य परीक्षा दिली. २२ मार्च २०२२ रोजी या परीक्षेचा निकाल लागला. आणि अभिजित ३०० पैकी २४७ गुण मिळवून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातून १०वा तर सोलापूर जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

इतकेच नव्हे तर अभिजीतने लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतानाच केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या मार्च २०२० मधील पूर्व परीक्षा व २६ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य परीक्षा दिली होती. याचा निकालही २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाला. या परिक्षेतही अभिजीत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाला. केवळ एक महिन्याच्या अंतराने अभिजीतने चक्क दोन महत्त्वाच्या पदांना गवसणी घातल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले अपार कष्ट आपल्याला यशस्वी करू शकले, अशी प्रतिक्रिया अभिजीतने दिली. अभिजित याच्या यशाने परिसरातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025