केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (UPSC)घेण्यात येणाऱ्या भारतीय अभियांत्रिकी सेवेसाठीच्या परीक्षेत (IES)सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून आलेल्या तरुण देशात पहिला आहे. हर्षल भोसले या मंगळवेढा तालुक्यातल्या तरुणाने हे मोठं यश मिळवलं आहे. UPSC Engineering Services Examination 2020 देशभरातून मोजक्या अभियंत्यांची निवड होते. या यादीत अग्रक्रम मिळवण्याचा मान महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणाला मिळाला आहे. देगावच्या माध्यमिक आश्रमशाळेतही त्यानं काही वर्षं शिक्षण घेतलं.
लहानपणीच वडील वारले आणि आईने शेती करून हर्षलला वाढवलं. हर्षल ज्ञानेश्वर भोसले मुळचा तांडोर गावचा. हर्षलचं शिक्षण मंगळवेढ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. बीडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून त्याने इंजीनिअरिंगचा डिप्लोमा केला.
त्यात चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजीनिअरिंगची पदवी घएतली. लगेगच त्याला भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये कामाची संधी मिळाली. तिथल्या प्रशिक्षणानंतर ONGC ला जॉइन झाला. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये हर्षल रुजू झाला आणि स्पर्धा परीक्षेची तयारीही त्याने तिथेच केली. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे इंडियन इंजीनिअरिंग सर्व्हिससाठी परीक्षा घेतली जाते. जानेवारीमध्ये प्रीलिम आणि जूनमध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यात चांगले गुण संपादन केल्याने हर्षलची मुलाखतीसाठी निवड झाली. मुलाखतीचा टप्पाही यशस्वीरीत्या पार करून हर्षल भोसले देशात पहिला आला. 25 ऑक्टोबरला या परीक्षेचे निकाल upsc.gov.in या बेवसाईटवर जाहीर झाले. देशभरातून 494 उमेदवार या सेवेसाठी निवडले गेले. त्यात हर्षद पहिला आला. या परीक्षेंतर्गत 511 जागा रिक्त होत्या. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108 व अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या 106 जागा रिक्त होत्या.या यशानंतर हर्षलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.