बर्लिनची भिंत आणि 9 नोव्हेंबर
1961च्या ऑगस्ट महिन्यात बांधलेली ही भिंत अखेर, 9 नोव्हेंबर 1989 ला पाडण्यास सुरुवात झाली. या ऐतिहासिक घटनेला आज 28 वर्षं पूर्ण होत आहेत. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं मित्र राष्ट्रांच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. या युतीत होते ब्रिटन, अमेरिका, फ्रांससारखे पाश्चात्त्य देश आणि सोव्हिएत युनियन विजयी देशांनी मग जर्मनीला विभागून एकेका प्रांतावर नियंत्रण मिळवण्याचं ठरवलं. जर्मनीचा पश्चिम भाग युतीकडं तर पूर्व भाग सोव्हिएत संघाकडं गेला. बर्लिन हे शहर सोव्हिएत संघाकडं होतं, पण ते राजधानीचं शहर होतं. त्यामुळं बर्लिनचे चार भाग करून अमेरिका, फ्रांस, ब्रिटन आणि सोव्हिएत संघ चार देशांकडं द्यायचा निर्णय झाला. 1949 मध्ये जर्मनीचे दोन स्वतंत्र देश झाले. मित्र राष्ट्रांच्या नियंत्रणातल्या पश्चिम जर्मनीला ‘द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी’ म्हटलं गेलं. सोव्हिएत संघाच्या ताब्यातल्या पूर्व जर्मनीचं ‘जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ असं नामकरण करण्यात आलं. पश्चिम जर्मनीतील लोक मुक्तपणे देशात फिरू शकत होते. त्यांच्यावर बंधनं नव्हती. पण, पूर्व जर्मनीतील लोकांवर अनेक बंधनं होती. काही वर्षांतच पूर्व जर्मनीतील हजारो लोकांनी पश्चिम जर्मनीत पलायन करण्यास सुरुवात केली. 1961मध्ये सोव्हिएत संघाचे अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांनी पूर्व जर्मनीतील लोकांचं वाढतं स्थलांतर थांबवण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्यात भिंत बांधण्याचं ठरवलं. 13 ऑगस्ट 1961च्या एका रात्रीत या भिंतीचं बांधकाम पूर्ण करण्यात आली. 1980च्या दशकात क्रांतीचं बिगूल वाजू लागलं. पूर्व जर्मनीतील लोकांनी हवं तिथं जाण्याचं, राहण्याचं, आवडतं संगीत ऐकण्याचं आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलनं सुरू केली. पूर्वेकडील लोक हंगेरी आणि चेकोस्लोव्हाकियामार्गे पश्चिम जर्मनीत पळून जाऊ लागली. 9 नोव्हेंबरला पूर्व जर्मनीच्या एका नेत्यानं बर्लिन भिंतीचे दरवाजे लवकरच उघडण्यात येतील, अशी घोषणा केली. त्याच रात्री पूर्व जर्मनीतील लोक भिंतीजवळ जमा झाले. भिंतीचे दरवाजे उघडण्याची मागणी करू लागले. सुमारे 10.45 वाजता लोकांनीच दरवाजे उघडले आणि पश्चिम जर्मनीत प्रवेश केला. 9 नोव्हेंबर 1989 या दिवशी बर्लिनची भिंत पाडायला सुरुवात झाली. सरकारनं ही भिंत 1990 मध्ये पाडायला सुरुवात केली. भिंतीचा काही भाग आठवण म्हणून अजूनही ठेवण्यात आला आहे.