भारतात बिझनेस करणे झाले सोपे,
व्यवसाय सुलभ देशांच्या क्रमवारीत २३ स्थानांची सुधारणा
भारतात व्यवसाय करणे आता अधिक सोपे बनले आहे. व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताच्या क्रमावारीत मोठी सुधारणा झाली आहे. जागतिक बँकेने बुधवारी यासंबंधीचा महत्वाचा अहवाल जाहीर केला. भारताने व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत १०० व्या स्थानावरुन थेट ७७ व्या स्थानी झेप घेतली आहे. म्हणजे भारताच्या क्रमवारीत २३ स्थानांची सुधारणा झाली आहे.
या यादीत एकूण १९० देश असून वर्ल्ड बँकेने आज क्रमवारी जाहीर केली. ब्रिक्स देशांमध्ये भारताच्या बरोबरीने चीनच्या क्रमावारीतही मोठी सुधारणा झाली आहे. मागच्यावर्षी चीन ७८ व्या स्थानी होता. आता ४६ व्या स्थानी पोहोचला आहे. मागच्या दोन वर्षात भारताच्या क्रमवारीत तब्बल ५३ स्थानांची सुधारणा झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून भारताच्या क्रमावरीत तब्बल ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे. मागच्या वर्षी भारताच्या क्रमवारीत ३० स्थानांची सुधारणा झाली होती.
व्यवसाय सुलभतेचे जे १० निकष आहेत. त्यापैकी भारताने ८ निकषांमध्ये सुधारणा केली आहे. व्यवसाय अनुकूल देशांमध्ये न्यूझीलंड सर्वोच्च स्थानी असून सोमालिया व्यवसाय करण्यासाठी सर्वात वाईट देश आहे. पाकिस्तान या यादीत १३६ व्या स्थानी आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी बांधकाम परवानग्या, वीज, कर्जाची व्यवस्था, कररचना हे निकष व्यवसाय सुलभतेसाठी लक्षात घेतले जातात. वर्ल्ड बँकेच्या या अहवालामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे.
जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताने पटकावले ६६वे स्थान
जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीयपासपोर्टने ६६वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे. या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.
नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हेनले अँड पार्टनर्स’ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे. संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात; अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना (व्हिजिटर्स परमिट) किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.
भारतीय पासपोर्टला ६६ देशांत मुक्त संपर्काधिकार (अॅक्सेस) आहे. सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल १६५ देशांत असल्याचे ‘हेनले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या वार्षिक पासपोर्ट निर्देशांकात म्हटले आहे. केवळ २२ देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी आला आहे. २६ देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच ९0 व्या स्थानी आहे. २९ देशांच्या संपर्काधिकारासह सीरिया ८८व्या स्थानी, तर ३४ देशांच्या संपर्काधिकारासह सोमालिया ८७व्या स्थानी आहे.
जागतिक कीर्तीचे बौद्धविद्वान – उर्गेन संघरक्षित यांचे निधन
जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुबंधू आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता लंडनच्या हेरेफोर्ड रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना रविवारी रुणालयात दाखल करण्यात आले होते. लंडनजवळच्या कॉडिंग्टन कोर्ट येथील ‘अधिष्ठान’मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मूळचे ब्रिटिश असलेले संघरक्षित (डेनिस लिंगहूड) यांचा जन्म २६ आॅगस्ट १९२५ रोजी लंडन येथे झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिक म्हणून भारतात आले होते. युद्ध संपल्यानंतर ते बौद्धधम्माचा अभ्यास करण्यासाठी २० वर्षांपर्यंत भारतातच राहिले. उ. चंद्रमणी आणि भिक्खू जगदीश काश्यप यांच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली. ‘सर्व्हे आॅफ बुद्धिझम’, ‘रिव्हॉल्यूशन आॅफ डॉ. आंबेडकर’ आणि ‘नो युवर मार्इंड’ यासारख्या जवळपास १२५ पुस्तकांचे लेखक संघरक्षित यांनी डॉ. आंबेडकरांशी तीनवेळा भेट घेऊन धम्म चळवळीवर चर्चा केली होती. (वृत्तसंस्था)
२६ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, ११२ तालु्क्यात परिस्थिती गंभीर
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. राज्यातील अनेक तळी, विहिरी कोरडया पडल्या आहेत. पाण्याची, चाऱ्याची गंभीर स्थिती आहे.हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र सरकारने २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे.
जळगाव, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दुष्काळी तालुके आहेत. कमी पाऊस, भूजल कमतरता, शेतीची स्थिती आणि पेरणीखालील क्षेत्र या बाबी ध्यानात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आला. पुढच्या सहा महिन्यांसाठी दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपायोजना अंमलात येणार आहेत.
नियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.