Current Affair 02 November 2018
‘शक्ती’ भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर, आयआयटी मद्रासचे यश
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे. ‘शक्ती’ असे या मायक्रोप्रोसेसरला नाव देण्यात आले आहे. लवकरच तुमचे मोबाइल फोन, टेहळणी कॅमेरे आणि स्मार्ट मीटर्स या स्वदेशी बनावटीच्या ‘शक्ती’ मायक्रोप्रोसेसरवर चालतील.
या मायक्रोप्रोसेसरचे डिझाइनपासून सर्व काही आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या मायक्रोप्रोसेसरची मायक्रोचीप भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चंदीगड येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महत्वपूर्ण यश असून यामुळे परदेशी मायक्रोप्रोसेसरवरील अवलंबित्व कमी होणार असून सायबर हल्ल्याचा धोकाही कमी होईल.
जुलै महिन्यात आयआयटी मद्रासमधील बॅचने ३०० चीप डिझाइन केल्या होत्या. अमेरिकेतील ऑरेगनच्या इंटेल सुविधा केंद्रात या चीप जोडण्यात आल्या होत्या. आता देशात पूर्णपणे स्वदेशी बनावटीने हा मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला आहे. या प्रोसेसरची टेक्नोलॉजी पूर्णपणे वेगळी आहे असे वीजीनाथन यांनी सांगितले. भारतात बनलेला मायक्रोप्रोसेसर १८० एनएमचा आहे तर अमेरिकेत बनवलेला प्रोसेसर २० एनएमचा आहे.
अभिमानास्पद! जगातील सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांत
सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’
बीबीसीने २१ व्या शतकातील जगभरातील विदेशी भाषांतील (इंग्रजी वगळता) सर्वोत्कृष्ट १०० चित्रपट कोणते, हे निश्चित करण्यासाठी सर्व देशांतील काही समीक्षकांचा पोल घेतला. त्या १०० चित्रपटांत भारतातील एकच चित्रपट त्यात असून, तोही ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांचा अतिशय गाजलेला ‘पाथेर पांचाली’ हाच आहे.
जगभरातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांत भारतातील अन्य भाषांतील सोडाच; पण हिंदी भाषेतीलही चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. पाथेर पांचाली हा बंगाली चित्रपट भारतात १९५५ साली प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांमध्ये १५ व्या स्थानी आहे.
सरकारी तिजोरीत एक लाख कोटी रुपयांचा GST जमा
ऑक्टोबर महिन्यांत वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) सरकारच्या तिजोरीत १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
जेटली म्हणाले की, इतका चांगला महसूल मिळण्यामागील मोठे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे होय. या सकारात्मक उपाय योजनांमुळे हे यश सरकारला मिळाले आहे. सरकारी तिजोरीतील ऑगस्टमधील जीएसटीची मिळकत ९३, ६९० कोटी रुपये होती.
या आठवड्यात सरकारला अर्थव्यवस्थेसंदर्भात दोन चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे उद्योग सुलभतेत भारताच्या क्रमवारीत ५० स्थानांनी सुधारणा होऊन भारत ७७ व्या क्रमांकावर पोहोचला. तर दुसरी बाब म्हणजे जीएसटीच्या महसुलात झालेली विक्रमी वाढ.
जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले त्यावेळी भारताचा उद्योग सुलभतेबाबत १४२वा क्रमांक होता. त्यानंतर पंतप्रधानांनी पुढील वर्षात भारताचे टॉपच्या ५० देशांच्या खास यादीत स्थान मिळवायचे लक्ष्य ठेवले होते.
अभिमानास्पद! राहुल द्रविडचा सन्मान,
ICCच्या Hall of Fameमध्ये समावेश
भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला आज ICCच्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले.
केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.
आणखी २०० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर
राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना आधी जाहीर केलेल्या टंचाईसदृश भागातील काही तालुक्यांना वगळल्याची टीका होताच दुष्काळासाठी आता तालुक्याऐवजी मंडल (सर्कल) हा घटक विचारात घेण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार टंचाईसदृश २९ तालुक्यांतील २०० मंडलांमध्ये आज दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राच्या निकषात बसणाऱ्या १५१ तालुक्यांतील लोकांना केंद्राच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.
पेरणी, पडलेल्या पावसातील खंड, हवेतील आद्र्रता आणि पीक परिस्थिती यांचा विचार करून केंद्राच्या निकषात बसणाऱ्या १५१ तालुक्यात राज्य सरकारने बुधवारी दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात सर्वाधिक जळगाव जिल्ह्य़ातील १३ तालुक्यात तर अहमदनगर आणि बीड जिल्ह्य़ातील प्रत्येकी ११ आणि सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश आहे.
नियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.