रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराचे
४ जानेवारीला वितरण
- काही मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श करणाऱ्या बातम्या आणि छायाचित्रं यांचा १३व्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पत्रकारितेतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत शुक्रवारी, ४ जानेवारीला गौरव केला जाणार आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील १८ विविध गटांत २०१७मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या २९ पत्रकारांचा गौरव केला जाईल.
- ‘मीटू इन द न्यूजरूम : व्हॉट एडिटर्स कॅन अॅण्ड शुड डू’ या शीर्षकाच्या या परिसंवादात चार महिला संपादकांचा सहभाग लक्षणीय ठरणारा आहे. त्यात ‘द न्यूज मिनट’ या डिजिटल ब्लॉगच्या सहसंस्थापक आणि मुख्य संपादिका धन्या राजेंद्रन, मुंबई मिरर वृत्तपत्राच्या संपादिका मिनल बाघेल, ‘द क्विन्ट’च्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू कपूर आणि ‘बीबीसी वर्ल्ड सव्र्हिस’च्या भारतीय भाषक आवृत्तीच्या प्रमुख रुपा झा यांचा समावेश आहे.
- एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ एक्स्प्रेस वृत्तसमूहाने २००५मध्ये या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्काराची प्रेरक प्रथा सुरू केली. देशभरातील निर्भीड आणि व्रतस्थ पत्रकारितेचा जाहीर गौरव करणारा हा पुरस्कार अल्पावधीतच भारतीय माध्यमांतील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार ठरला आहे.
‘आधार’ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर
- कोणावरही आधार क्रमांकासाठी सक्ती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे केंद्र सरकारने लोकसभेत आधारविषयक सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार टेलिफोन कंपनी वा बँकांना ग्राहकांना स्वत:हून आधारचे प्रमाणीकरण करता येईल.
- आधारच्या प्रमाणीकरणाची सक्ती कोणावरही केली जाणार नाही. शिवाय, आधारमधील माहिती उघड केली जात नाही.
- आधारमुळे थेट रोख रक्कम लाभार्थीना देणे शक्य झाले असून त्यामुळे सरकारचे ९६ हजार कोटी रुपये वाचले आहेत. आधार योजना जागतिक बँक तसेच आंतरराष्ट्रीय नाणनिधीनेही वाखाणली आहे. ज्या नागरिकांना आधार क्रमांक उघड करायचा नसेल त्यांना पर्यायी क्रमांक देण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे खासगी हक्क अबाधित राहू शकेल.
माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन
- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं नागपुरातील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.
- ते ९२ वर्षाचे होते. २००३ साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या रूपानं सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस बाळगणारा व त्यासाठी प्रयत्न करणारा एक सच्चा व समन्वयी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
- चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला होता.
- न्यायाधीशासोबतच ते उत्तम लेखक होते. १९३०, १९३२ आणि १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि १९४१ मध्ये त्यांनी स्वातंत्र्य सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली
देना, विजया आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकर
- केंद्रीय मंत्रिमंडळाने विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील हा महत्वपूर्ण निर्णय आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर मोदी सरकारने हा निर्णय घेतला.
- विलीनीकरणानंतर विजया बँक, देना बँकेचे सर्व व्यवहार बँक ऑफ बडोदामध्ये ट्रान्सफर होतील. या दोन्ही बँकांची मालमत्ता, लायबलिटी, अधिकार, परवाने सर्व उपक्रम बँक ऑफ बडोदाकडे जातील.
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे निधन
- जागतिक किर्तीचे खेळाडू घडविणारे आणि पद्मश्री, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
- भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांची खास ओळख आहे. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ मध्ये झाला.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी १९४३ पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, ते क्रिकेटच्या मैदानावर प्रत्यक्षात उतलेले नाहीत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली खेळाडू घडविण्यात रस दाखवला.
- १९९० मध्ये क्रीडा क्षेत्रातला मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले होते.