चंद्रावरील अपरिचित ठिकाणी उतरले चीनचे यान
- चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. कारण, चीनने चंद्राच्या बाहेरच्या भागावर जो पृथ्वीवरुन दिसत नाही त्यावर इतिहासात पहिल्यांदाच अंतराळ यान उतरवले आहे. याचे नाव चांगे-४ असे असून गुरुवारी सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. यापूर्वी चीनने चंद्रावर एक रोवर यानही उतरवले होते.
- यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रशियन संघाने चंद्रावर यान उतरवले होते. मात्र, चांगे-४ हे यान चंद्राच्या खालच्या भागावर उतरवण्यात आले आहे. जो भाग पृथ्वीपासून कायमच दूर अंतरावर असतो.
- तज्ज्ञांच्या मते, चीन वेगाने आपला विकास करीत आहे. तो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि इतर क्षेत्रात अमेरिकेलाही आव्हान देऊ शकतो. चीन २०२२पर्यंत आपले तिसरे अंतराळ स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे.
लिगो प्रकल्प उभारणीला वेग
- औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या लिगो प्रकल्पासाठी वन विभागाची १२१ हेक्टर जमीन हस्तांतरणास केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाने हिरवी झेंडी दाखविली आहे.
- दुघाळा परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर या प्रयोगशाळेची उभारणी होणार आहे.
- गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत.
- भारतामध्ये उभारली जाणारी ही पहिलीच प्रयोगशाळा असल्यामुळे केंद्र शासनासह राज्य शासनाचे या प्रयोगशाळेच्या उभारणीकडे लक्ष लागले होते.
विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय
- विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत नापास न करण्याच्या विधेयकाला आज राज्यसभेत मंजूरी देण्यात आली. मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
- नि:शुल्क आणि अनिवार्य बाल शिक्षणाच्या अधिकार (संशोधन) विधेयक 2019 वर आज राज्यसभेत चर्चा झाली. त्यानुसार नापास झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना त्याच वर्षात ठेवायचे ? का नाही ? याबाबतच निर्णय संबंधित राज्यांना देण्यात आला आहे.
राज्यात महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले नसते तर महाराष्ट्र पुरोगामी झाला नसता, राज्यात समतेचे राज्य आले नसते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
- तसेच शिरवळ-नायगाव-मांढरदेव या रस्त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करू. तालुक्यातील नीरा-देवघर प्रकल्पाच्या गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी येथील उपसा जलसिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही कामे सुरू नाहीत. ही कामे त्वरित सुरू करून खंडाळा तालुक्यातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करू. या योजनांसाठी केवळ 19 टक्के इतकेच वीजबिल भरावे लागेल. उर्वरित 81 टक्के वीज बिलाचा बोजा शासन सोसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.