चीनकडून पाकला ६ अब्ज डॉलर
- गंभीर आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी ‘मित्र’देश चीन धावून आला असून, पाकला ६ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत करण्याचे आश्वासन चीनतर्फे शुक्रवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिंगपिंग यांची भेट घेतली. त्यानंतर इम्रान खान यांना या मदतीबाबत आश्वस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- इम्रान खान प्रथमच चीनभेटीवर आले असून, आधी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांतील चर्चेनंतर इम्रान आणि जिंगपिंग यांच्यात थेट भेट झाली. इम्रान यांच्या दौऱ्यादरम्यानच पाकला ही ६ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय चीनकडून पाकला दीड अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचाही प्रस्ताव आहे, असे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे.
गंगा जलमार्गावरील वाराणसी बंदराचे १२ नोव्हेंबरला उद्घाटन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये गंगा नदीतून मालवाहू जहाजांची वाहतूक होणार असून, त्यासाठी रामनगरात तयार झालेल्या मल्टि-मोडल टर्मिनलचे १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ट्विटद्वारे दिली.
- देशातील पहिला अंतर्गत जल महामार्ग (इनलँड वॉटर हायवे) वाराणशीहून पश्चिम बंगालमधील हल्दियापर्यंत जाणार असून, वर्षांतील ३६५ दिवस येथून मालवाहू जहाजांद्वारे मालवाहतूक होईल. कोलकात्याहून एक जहाज २८ ऑक्टोबरला निघाले असून, त्यावर पेप्सिकोचे १६ कंटेनर आहेत.
- वाराणशी ते हल्दियादरम्यान जलमार्गाचे अंतर १३९० किलोमीटर आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी हे ‘एमव्ही आर. एन. टागोर’ चे नव्या टर्मिनसवर स्वागत करण्यास उपस्थित राहतील.
दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे बंद होणार
- डिजिटलच्या तुफानात दूरदर्शनचा काड्यांचा अॅँटेना इतिहासजमा होणार आहे. अॅनालॉग पद्धतीची देशभरातील सुमारे 1400 प्रक्षेपण केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. DD India
- पहिल्या टप्प्यात 272 केंद्रे बंद करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 214 केंद्रे 17 नोव्हेंबरला बंद होतील. राज्यातील साता-यासह 12 केंद्रांचा त्यात समावेश आहे.
- सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यातच अॅनालॉग पद्धतीच्या प्रक्षेपकाची (ट्रान्समीटर) आयुमर्यादा सुमारे 15 वर्षे असते. सध्याच्या काळात नवे ट्रान्समीटर तुलनेने खर्चिक आहेत.
- शिवाय उपग्रह (डीटीएच) सेवा स्वस्त आहे. यामुळे 15 वर्षांहून अधिक काळ झालेले ट्रान्समीटर बंद करण्याचा निर्णय 2015 मध्ये केंद्र सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी 2018 मध्ये सुरू झाली.