Uncategorized
Current Affair 06 December 2018
देशातील सर्वात लांब जोडपूल २५ डिसेंबरला खुला
- ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल- रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत. ४.९४ किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील.
- माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी १९९७ साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर २००२ सालीच या पुलाचे काम सुरू झाले. गेल्या १६ वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर ३ डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.
म. सु. पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
- भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०१८ ची घोषणा झाली. विविध २४ भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. २९ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- डॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्स’ म्हणून निवड करण्यात आली होती.
- हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. २०३ – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
RBI कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ‘जैसे थे’
- रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने ६.५ टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के आणि बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवला आहे.
- २०१९-२० मध्ये जीडीपी ७.४ टक्के राहिल असा अंदाज आहे. २०१८-१९ च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर २.७ ते ३.२ टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला.
- नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले. त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये ७.१ टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्के होता. यावर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.
शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प
- शेतमालाला चांगला भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांची उत्पादने थेट कॉपोर्रेट कंपन्यांना विकता यावीत, यासाठी राज्य सरकारने जागतिक बँकेच्या साहाय्याने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ (स्टेट आॅफ महाराष्ट्राज अॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्स्फॉर्मेशन) प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
- राज्य सरकार, विविध कॉर्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या यांच्यात ४६ सामंजस्य करार करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात राज्यातील १० हजार गावांमध्ये स्मार्ट प्रकल्प राबविला जाईल.
- राज्यातील कृषी क्षेत्राशी निगडित विविध घटक, धोरणकर्ते आणि शेतकरी यात सहभागी झाले होते. या प्रकल्पात सुमारे २ हजार ११८ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यापैकी १ हजार ४८३ कोटींचा गुंतवणूक जागतिक बँक करणार आहे, तर राज्य सरकारकडून ५६५ कोटींची निधी दिला जाणार आहे.
कोळसा घोटाळ्यात माजी सचिवांना तीन वर्षे कारावास
- कोळसा खाणवाटप गैरव्यवहाराप्रकरणी दिल्ली कोर्टाने माजी कोळसा सचिव ए. सी. गुप्ता यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
- गुप्ता यांच्यासह के. एस. क्रोफा आणि के. सी सामरिया या नोकरशहांनाही तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. तुरुंगवासाची शिक्षा चार वर्षांपेक्षा कमी असल्याने तिघांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- सप्टेंबर २०१२ मध्ये पश्चिम बंगालमधील मोईरा आणि मधुजोर येथील कोळसा खाणींच्या ‘व्हीएमपीएल’ला केलेल्या वाटपामध्ये अनियमितता दिसून आल्याने ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला होता.
- गुप्ता हे ३१ डिसेंबर २००५ ते नोव्हेंबर २००८ या काळात कोळसा सचिव म्हणून कार्यरत होते. ‘व्हीएमपीएल’च्या प्रकरणाआधी गुप्ता यांना कोळसा खाणवाटपाच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले होते. त्याप्रकरणात त्यांना दोन आणि तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या दोन्ही खटल्यांमध्ये ते सध्या जामीनावर आहेत. कोळसा खाणवाटप गैरव्यवहाराच्या १२ प्रकरणांमध्ये गुप्ता आरोपी असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले.