देशातील पहिली विनाचालक सौर उर्जेवरील बस
- पंजाबच्या ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या (एलपीयू) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्टबस बनवली आहे. ही बस केवळ सौर उर्जेवरच धावणार असं नाही तर या बसमध्ये चालकाची गरजच नाहीये. 106 व्या ‘इंडियन सायंस काँग्रेस’मध्ये ही बस सादर करण्यात आली. पूर्णतः प्रदूषणमुक्त असलेल्या या बसची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे.
- ‘गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत होतो, बसचा सगळा प्रोग्रॅम सेट करण्यास 12 महिन्यांचा वेळ लागला, यामध्ये अनेक स्मार्ट फिचर्स अॅड करण्यात आलेत.
- बसमधील मोटर सौर उर्जेच्या सहाय्याने सुरू होते आणि याद्वारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. चालकाशिवाय 30 किलोमीटर प्रतितास वेगाने ही बस धावू शकते.
- बसच्या मागील आणि पुढील बाजूला सेंसर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गात काही अडथळा असल्यास ही बस आपोआप थांबेल किंवा 10 मीटर आधीच अलर्ट देईल.
- एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या बसने 10 ते 30 प्रवाशांसह 70 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. नेव्हिगेशनसाठी जीपीएस आणि ब्ल्यूटुथचा वापर केला जातो. 10 मीटरच्या परिसरातूनही या बसवर कंट्रोल करता येणं शक्य आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा आणीबाणीचा इशारा
- मेक्सिको सीमेवर कोटय़वधी डॉलर्स खर्च करून भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर आपण ठाम असून त्यासाठी अमेरिकी सरकार टाळेबंदीमुळे वर्षभर बंद राहिले तरी त्याची तयारी आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच्या बैठकीनंतर सांगितले की, भिंत बांधण्यासाठी तरतुदीवर आपण ठाम असून त्यासाठी सरकारची वर्षभर टाळेबंदी झाली तरी आपण मागे हटणार नाही.
- सीमेवरील सुरक्षा महत्त्वाची असून आज ना उद्या लोकांना याचा विचार करावा लागणार आहे. आम्हाला जे करणे गरजेचे आहे ते आम्ही करूच असे ते म्हणाले. अनेकांना वेतनाविना काम करावे लागत असून अनेक जण बिनपगारी रजेवर आहेत तरी या संघराज्य कर्मचाऱ्यांचा अमेरिकी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा आहे असा दावा करून ते म्हणाले की, या लोकांना सध्या कामाचे पैसे मिळत नाहीत पण त्यातील अनेक जण आमच्या भूमिकेचे समर्थक आहेत, असे ते म्हणाले. प्रतिनिधिगृहात आता डेमोक्रॅटिक पक्षाचे संख्याबळ वाढले असून टाळेबंदीवर कोणताही तोडगा सध्या दृष्टिपथात नाही. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प कुठल्याही सवलती देण्यास तयार नाहीत.
महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-दिविज यांना विजेतेपद
- भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने पुरुष दुहेरीत ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज आणि जॉनी ओमारा या जोडीचा ६-३, ६-४ असा सहज पराभव करत एमएसएलटीएतर्फे आयोजित टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
- दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अव्वल मानांकित बोपण्णा-दिविज जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. १ तास ३ मिनिटे रंगलेल्या या एकतर्फी लढतीत बोपण्णा-दिविज जोडीने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकून विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली.
- दुसऱ्या सेटमध्येही बोपण्णा-दिविज जोडीने आपले वर्चस्व कायम राखले. प्रारंभीच्या २-२ अशा बरोबरीनंतर बोपण्णा-दिविज जोडीने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर बांब्रिज-ओमारा यांनी सामन्यात पुनरागमन करून ४-४ अशी बरोबरी साधली. अखेर पुन्हा एकदा प्रतिस्पध्र्याची सव्र्हिस मोडीत काढत बोपण्णा-दिविज जोडीने ६-४ अशा फरकासह विजेतेपदावर नाव कोरले.