आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
- शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी संपणार आहे.
- पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा असल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी 4 जुनला राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला. यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
- मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.
- आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
फुटबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय
- आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रारंभीच केलेल्या दोन गोलसह पायाभरणी करीत थायलंडवर 4-1 असा विजय मिळवला.
- भारताने 1964 सालानंतर आशियाई स्पर्धेत मिळवलेला हा पहिला ऐतिहासिक विजय आहे. तसेच इतक्या मोठय़ा फरकासह मिळवलेलेही हे पहिलेच यश आहे.
- कारकीर्दीतील दुसऱ्या आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या छेत्रीने सामन्याच्या २७व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टीवर पहिला गोल लगावला. त्यानंतर सहाच मिनिटांनी थायलंडचा कर्णधार टेरासिल दांगडाने 33व्या मिनिटाला थायलंडचा पहिला गोल रचून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा भारताने त्यांच्या आक्रमणांची धार वाढवली. 46व्या मिनिटाला उदांता सिंगने दिलेल्या अप्रतिम पासवर छेत्रीने पुन्हा एकदा अफलातून गोल करीत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली.
- ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत भारत 97व्या स्थानावर आहे, तर थायलंड 118व्या स्थानावर असल्याने भारताला या सामन्यात वरचढ मानले जात होते. मात्र पूर्वार्धातच भारत विजयी आघाडी घेईल, अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती.
भारतीयांच्या ई-वॉलेट वापरात वाढ
- जगातील दुसरा मोठा ऑनलाइन बाजार असणाऱ्या भारतात आता ई वॉलेटचा वापर ८ टक्क्यांनी वाढला आहे. एक व्यक्ती सरासरी तीन हजार रुपये डिजिटल पद्धतीद्वारे महिन्याला खर्च करत असल्याचे पाहणीतून आढळले आहे.
- सध्या तंत्रज्ञानाने युग आहे. या डिजिटल युगात विविध कामांसाठी महाजालाचा वापर केला जातो. यामुळे वेबपोर्टल, अॅपचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक वेळी रोखीचा वापर करण्यापेक्षा लोक ई वॉलेटचा किंवा डिजिटल पद्धतीचा वापर करू लागले असून महाजालाचा वापर करून पैसे भरण्याच्या वापरात ८.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या वापराचे एकूण प्रमाण ६० टक्के आहे.
- नोटाबंदीनंतर ई पद्धतीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आणि लोकांनी ई वॉलेटचा पर्याय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला. सध्या दीडशेहून अधिक अॅप भ्रमणध्वनीच्या आयओएस आणि अँड्रॉईड प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
भारताचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय
71 वर्षांनंतर यश
- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची सिडनी येथील चौथी कसोटी ड्रॉ झाली आहे. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दोन्ही देशांदरम्यानच्यास 71 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवला आहे. भारत ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा जगातील पाचवा आणि आशियातील पहिला संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे.
- टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये 1947 मध्ये पहिली कसोटी मालिका खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियात 12 कसोटी मालिका खेळल्या. त्यातील हा पहिलाच मालिका विजय आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 8 मालिका गमावल्या आहेत. तर तीन वेळा मालिका ड्रॉ झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने दुसऱ्यांदा दोन कसोटी जिंकल्या आहेत. यापूर्वी 1977/78 मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन कसोटी जिंकल्या होत्या. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी जिंकून मालिका जिंकली होती.