नासाच्या ‘टेस’ मोहिमेत नव्या ग्रहाचा शोध:
- नासाने अलिकडेच सौरमालेबाहेर एक ग्रह शोधून काढला असून तो 53 प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्र्हे सॅटेलाइट म्हणजे टेस अंतर्गत एप्रिलपासून शोधण्यात आलेला हा तिसरा ग्रह आहे.
- या ग्रहाचे नाव एचडी 21749 बी असे आहे. तो बटू ताऱ्याभोवती फिरत असून हा तारा 53 प्रकाशवर्षे दूर आहे.
- ग्रहाचा कक्षा काळ हा आतापर्यंत शोधलेल्या तीन ग्रहात सर्वाधिक आहे. एचडी 21749 बी ग्रह हा ताऱ्याभोवती 36 दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. आधीच्या पाय मेन्सा बी या महापृथ्वी मानल्या जाणाऱ्या ग्रहाचा प्रदक्षिणा काळ 6.3 दिवस असून एलएचएस 3844 बी या खडकाळ ग्रहाचा प्रदक्षिणा काळ 11 तासांचा आहे.
- सर्व तीन ग्रह टेस निरीक्षणांच्या पहिल्या तीन महिन्यांत शोधले आहेत. नव्या ग्रहावरचे तपमान 300 अंश फॅरनहीट असण्याची शक्यता असून तो तुलनेने थंड आहे. सूर्याइतक्या तप्त ताऱ्याच्या जवळ असूनही त्याचे हे तपमान तुलनेने कमी मानले जाते. या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी तो शीत ग्रह असल्याचे अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधक डायना ड्रॅगोमीर यांनी सांगितले.
Geeta Gopinath: नाणेनिधीवर गीता गोपीनाथ
- भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे स्वीकारली. नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची जबाबदारी लाभलेल्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. ४७ वर्षीय गीता या मूळच्या म्हैसूरच्या असून त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
- नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॉरिस ऑब्स्टफेल्ड हे ३१ डिसेंबरला निवृत्त झाले. नाणेनिधीने एक ऑक्टोबरला गीता यांच्या नावाची घोषणा केली होती. गीता या असामान्य बुद्धीच्या अर्थतज्ज्ञ असून त्यांना पुरेसा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. तसेच, त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुणही आहेत, अशा शब्दांत नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टाइन लेगार्ड यांनी गीता यांची प्रशंसा केली होती.
भारत-नॉर्वे संबंधांना नवी दिशा देण्याबाबत मोदी-सोलबर्ग चर्चा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्याशी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे प्रयत्न आणि परस्पर संबंधांना नवी दिशा देण्याबाबत सहकार्य करण्यावर चर्चा केली.
- मोदी आणि सोलबर्ग यांनी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली आणि भारत-नॉर्वे संबंधांचा आढावाही घेतला. सर्व क्षेत्रांमधील सहकार्याबाबत आम्ही आढावा घेतला आणि परस्पर संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा कशी देता येईल याबाबतही चर्चा केली, असे मोदी यांनी या चर्चेनंतर जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि नॉर्वे यांच्यात चांगले सहकार्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद सुधारणांवर दोन्ही देश सहकार्य करीत आहेत, त्याचप्रमाणे दहशतवादावरही चर्चा करण्यात आली.
- मोदी यांच्यासमवेत ऊर्जा, हवामान बदल आणि पर्यावरण आदी प्रश्नांवरही चर्चा करण्यात आल्याचे सोलबर्ग यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
आलोक वर्मा पुन्हा CBI प्रमुखपदी
- सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्रीय दक्षता आयोगाचा (सीव्हीसी) निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे.
- या निर्णयामुळं आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. आलोक वर्मांना पदावरून हटवण्यापूर्वी सिलेक्ट कमिटीची सहमती मिळवणे गरजेचं असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना नोंदवलं आहे.
- आलोक वर्मा यांना अशा पद्धतीने पदावरून दूर करणं असंवैधानिक असल्याचंही सुप्रीम कोर्टानं नमूद कलं आहे.
- सरन्यायाधीश रजेवर असल्यामुळं न्यायाधीश के. एन. जोसेफ आणि न्यायाधीश एस. के. कौल यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना १० टक्के आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मंजूर
- सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या आरक्षणासाठी राज्यघटनेत १२४वी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे.
- या विधेयकातील सर्वंच संशोधनांना बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ ३२३ मतं पडली तर ३ खासदारांनी याविरोधात मतदान केले.
- यासाठी एकूण ३२६ खासदारांनी मतदान केले होते. यानंतर आता राज्यसभेत याची खरी कसोटी लागणार आहे.