RBI च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची निवड
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास माजी अर्थ सचिव आहेत.
- सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य आहेत. काल उर्जित पटेल यांनी तडकाफडकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली होती.
- माजी अर्थ सचिव असलेल्या शक्तिकांत दास यांची तीन वर्षांसाठी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरजित भल्ला यांचा राजीनामा
- सुरजित भल्ला यांनीही मंगळवारी पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा राजीनामा दिला.
- भल्ला यांनी काही वाहिन्यांवर पटेल यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. अशातच भल्ला यांनी स्वत:हून टिष्ट्वटद्वारे परिषदेचे सदस्यत्व सोडल्याचे जाहीर केले.
- पंतप्रधान मोदी यांची साथ सोडणारे भल्ला हे मागील १५ महिन्यांतील चौथे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत. याआधी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढीया यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये राजीनामा दिला होता.
- जून २०१८ मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता उर्जित पटेल आणि सुरजित भल्ला यांनी स्वत:ला केंद्र सरकारपासून दूर केले आहे.
बोस्टवाना ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच सुवर्ण
- बोस्टवाना येथे पार पडलेल्या 15व्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला 5 सुवर्ण तर 1 रौप्य पदक मिळाले आहे.
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात पार पडलेल्या या ऑलिम्पियाडमध्ये 44 देशांतील 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.
- या स्पर्धेत जळगाव येथील अमेय देशमुख, दिल्लीतील धनंजय रमण, कोटा येथील मोहित गुप्ता, नमन सिंग राणा आणि इशापूर येथील वैभव राज यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोटा येथील बरून परुआ याने रौप्य पदकावर नाव कोरले.
- नागपूर येथील हिस्लोप कॉलेजचे प्राध्यापक हेमंत पांडे, भाभा अणुसंशोधन केंद्रातील डॉ.ए.के. राजाराजन आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील निवृत्त प्रा.व्ही.गो. गंभीर या तिघांनी या टीमचे नेतृत्त्व केले. या टीमला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले यानंतर या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी केली आहे.
भारत ठरला जगातला चौथा मोठा शस्त्र विक्रेता
- एकेकाळी जगातील सगळ्यात मोठा शस्त्रांचा आयात करणारा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
- स्टॉकहोल्मच्या पीस रिसर्च इन्स्टिट्यूट केलेल्या सर्वेक्षणात भारत चौथा सगळ्यात मोठा शस्त्र निर्यात करणारा देश आहे हे स्पष्ट झालं आहे.
- रशिया, अमेरिका,चीनच्या धरतीवर संरक्षण तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले आहेत. गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात मिसाइल्स आणि उपग्रहांची निर्मिती भारतीय शस्त्राज्ञांनी केली आहे.
- भारताचा या क्षेत्रातला वृद्धीदर हा अमेरिकेहूनही जास्त आहे हे स्पष्ट झालं आहे. तेव्हा येत्या काळात भारत संरक्षण क्षेत्रातील एक बळकट ताकद म्हणून उदयास येईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
मुक्ता बर्वेला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर:
- मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार 2018‘ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व 40 वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
- तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार 2018‘ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-3’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार आहे.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.