ब्रिटनमध्ये थेरेसा मे विश्वासदर्शक ठरावात विजयी
- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ब्रेग्झिट समझोत्यावरून अडचणीत आल्यानंतर हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता.
- ब्रेग्झिट करारावरुन थेरेसा मे यांच्याविरोधात हुजूर पक्षाच्या खासदारांनीच अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी मे यांना पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते आवश्यक होती.
- बुधवारी ब्रिटनमधील संसदेत अविश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला. मे यांना ३१७ पैकी २०० मते मिळाली.
- हुजूरपक्षाच्या ६३ टक्के खासदारांनी मे यांच्या बाजूने मतदान केले. तर ३७ टक्के खासदारांनी त्यांच्याविरोधात मतदान केले.
इनसाइट यानाची मंगळावरून पृथ्वीकडे ‘सेल्फी’
- अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर पाठवलेल्या इनसाइट यानाने यांत्रिक बाहू व कॅमेरा यांच्या मदतीने सेल्फी छायाचित्र घेतले असून त्यात एकूण अकरा प्रतिमांचे ते संकलन आहे असे सांगण्यात आले.
- क्युरिऑसिटी रोव्हर मोहिमेतही याच पद्धतीने छायाचित्रे काढण्यात आली होती. नंतर ती एकत्र जुळवण्यात आली होती. या स्वप्रतिमेत (सेल्फी) लँडरचे सौर पंख व सगळी वैज्ञानिक उपकरणेही दिसत आहेत.
- इनसाइट लँडर मंगळावर खडकाळ भागात उत्खननाचे काम सुरू करणार असून हे यान २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरले आहे.
औद्योगिक उत्पादन दराची ८.१ टक्क्य़ांवर झेप;
महागाई दराची ३ टक्क्य़ांखाली घसरण
- देशाच्या उद्योग क्षेत्राच्या तब्येतीचे निदर्शक असलेल्या औद्योगिक उत्पादन दराने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये ८.१ टक्क्य़ांची पातळी गाठली असून, तो गेल्या ११ महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. त्याच वेळी किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरही नोव्हेंबर महिन्यात तीन टक्क्य़ांखाली दिलासादायी स्थिरावला असल्याचे दिसून आले.
- औद्योगिक उत्पादन दराने आधीच्या सप्टेंबरमधील ४.५ टक्क्य़ांच्या तुलनेत जवळपास दुपटीने उसळी घेत ऑक्टोबरमध्ये ८.२ टक्क्य़ांची पातळी गाठल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या आकडेवारीवरून बुधवारी स्पष्ट झाले.
- ऊर्जानिर्मिती क्षेत्रातून उत्पादन दराने तर १०.८ टक्क्य़ांची आणि भांडवली वस्तू क्षेत्राचा वृद्धिदर १६.८ टक्के पातळीवर होता. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे प्रमाण अनुक्रमे ३.२ टक्के आणि ३.५ टक्के असे होते.
- ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण क्षेत्रानेही मागील ९ टक्क्य़ांच्या तुलनेत यंदा १७.६ टक्के दराने वाढ दर्शविली. खाणकाम क्षेत्राची वाटचाल ऑक्टोबर २०१७ मध्ये उणे ०.२ टक्के दराने सुरू होती. यंदा मात्र हे क्षेत्र ७ टक्के दराने वाढताना दिसले.
- दुसरीकडे महागाईच्या आघाडीवर दिलासा अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांना बुधवारी प्रसिद्ध आकडेवारीने दिला. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये २.३३ टक्के नोंदविण्यात आला. महागाई दराचा ही मागील दीड वर्षांतील नीचांक स्तर आहे.
- ऑक्टोबर २०१८ मध्ये महागाई दर ३.३८ टक्के (सुधारित आकडेवारीनुसार) पातळीवर, तर मागील वर्षी नोव्हेंबर २०१७ मध्ये महागाई दर ४.८८ टक्के असा होता.
- गेल्या सलग चार महिन्यांपासून महागाई दरात निरंतर उतार सुरू आहे. यंदा नोंदविल्या गेलेल्या २.३३ टक्के महागाई दरापेक्षा कमी १.४६ टक्क्य़ांचा दर जून २०१७ मध्ये नोंदविला गेला आहे.
टेबल टेनिसपटू मनिका बत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
- भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेचा मानाचा ‘Breakthrough Star’ पुरस्कार मिळवणारी मनिका पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. इंचॉन येथे हा सोहळा पार पडला. Manika-Batra
- 2018 साल मनिकासाठी चांगले गेले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मनिकाने भारताला महिला टेबल टेनिसमध्ये पहिले सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. चार वेळा सुवर्णपदक विजेत्या सिंगापूरच्या प्रतिस्पर्ध्याचा मनिकाने 3-1 ने पराभव केला होता.
- तर यानंतर वैय्यक्तिक प्रकारातही मनिकाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. याचसोबत महिला दुहेरी प्रकारात रौप्य तर मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदकाची कमाई करत मनिका बत्राने भारताचे स्थान भक्कम केले होते.
- 23 वर्षीय मनिका बत्राने यानंर इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शरथ कमालच्या साथीने मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. यादरम्यान जागतिक क्रमवारीत मनिकाने 52 हे आपले सर्वोत्तम स्थान पटकावले होते.