ज्येष्ठ अभिनेत्री ‘आशा पारेख’ यांना जीवनगौरव पुरस्कार
- ‘बिमलदा माझे मायबाप आहेत. त्यांच्यामुळेच मी सिनेसृष्टीत आले. नाहीतर डॉक्टर किंवा अन्य व्यवसायात असते’, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या आठवणी जागवल्या. त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 52व्या स्मृतीदिनानिमित्त ‘बिमल रॉय मेमोरियल फिल्म सोसायटी’कडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ट्रस्ट येथे पार पडला. आशा पारेख 8-9 वर्षांच्या असताना बिमल यांनी त्यांना अभिनय करण्याची पहिली संधी दिली होती.
- तसेच सुलोचना दीदींकडूनही त्यांना अभिनयाविषयी मार्गदर्शन मिळाले.
न्या. सिक्रींनी नाकारला राष्ट्रकुल प्राधिकरणाच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी केंद्रातील मोदी सरकारने दिलेला राष्ट्रकुल सचिवालय लवाद प्राधिकरण (CSAT) सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारला आहे.
- कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट आर्बिट्रल ट्रिब्युनल (CSAT) हा लंडन स्थित लवाद आहे. सिक्री हे आलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपदावरून हटवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ज्या उच्चस्तरीय समितीने घेतला, त्या समितीचे एक सदस्य होते.
- राष्ट्रकुल देशांमध्ये काही मतभेद, वाद झाल्यास त्यांवर तोडगा काढण्याचे, मतभेद मिटवण्याचे काम लवाद प्राधिकरण करीत असते. या प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव केंद्राने न्या. सिक्री यांना दिला होता. या सदस्यत्वाची मुदत चार वर्षे असून, वर्षभरात चार ते पाच वेळा या प्राधिकरणाच्या लंडन येथील कार्यालयात सदस्यांना जावे लागते. या प्राधिकरणावर अध्यक्षांसह आठ सदस्यांची नियुक्ती होते.
लोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक
- लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत लोहगाव विमानतळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
- लोहगाव विमानतळावरून दररोज उड्डाण होणाऱ्या विमानांची संख्या गेल्यावर्षी 158 होती, तर आता हे प्रमाण 200 वर पोचले आहे.
- बंगळूर विमानतळाच्या प्रवाशांची संख्या 28 टक्क्यांनी, अहमदाबाद विमानतळाची 22.8 टक्क्यांनी, हैदराबाद विमानतळाची 21.9 टक्क्यांनी, तर चेन्नई विमानतळाच्या प्रवाशांची संख्या 14.7 टक्क्यांनी वाढली आहे. पुणे विमानतळाची संख्या 14.6 टक्क्यांनी वाढली आहे.
वादळाची पूर्वसूचना बारा तास आधी
- उत्तर भारतातील राज्यांमध्ये या वर्षी मान्सूनआधी संहारक वादळांच्या तडाख्यात २०० जणांचा मृत्यू झाला होता. या आपत्तीतून धडा घेत, अशा वादळांची पूर्वसूचना सहा ते बारा तास आधी देता यावी, यासाठी अभ्यासाचे मॉडेल हवामान विभाग तसेच अन्य यंत्रणांच्या साह्याने तयार करण्यात येत आहे.
- हवामान खात्यासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ) या संस्थांचे शास्त्रज्ञ या प्रकल्पावर काम करत असून त्याद्वारे वादळाची आधी पूर्वसूचना देता येऊ शकेल.