Uncategorized
Current Affair 20 November 2018
‘बेस्ट प्रॅक्टिसेस इन इन्स्टिटय़ूशन’ अहवालात महाराष्ट्राची आघाडी
- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) जाहीर केलेल्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस इन इन्स्टिटय़ूशन’ अर्थात चांगले काम होणाऱ्या संस्था या अहवालात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशभरातील ३० संस्थांचा समावेश असलेल्या या अहवालात महाराष्ट्रातील सर्वाधिक आठ संस्थांचा समावेश आहे.
- महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांसाठी केले जाणारे शैक्षणिक, मार्गदर्शनपर उपक्रम, गुणवत्तावाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न या अनुषंगाने देशभरातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी एआयसीटीईला माहिती पाठवली होती. त्यातून देशभरातील ३० संस्थांची निवड करण्यात आली. या संदर्भातील ४४ पानांचा अहवाल ‘एआयसीटीई’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
- राज्यनिहाय संस्था
महाराष्ट्र – ८
तामिळनाडू – ४
पश्चिम बंगाल – ३
तेलंगणा – ३
कर्नाटक – ३
दिल्ली – २
गुजरात – २
जम्मू काश्मीर, पंजाब, अंदमान निकोबार, उत्तर प्रदेश
हरयाणा प्रत्येकी – १
* निवड झालेल्या राज्यातील संस्था - वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली
- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी)
- टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट, इचलकरंजी
- इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग, माटुंगा, मुंबई
- विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक महाविद्यालय, इंदापूर
- आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
- वाचलंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर
- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे
छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात
९ मंत्र्यांसह १०७९ उमेदवार रिंगणात
- छत्तीसगढमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होत आहे. या टप्प्यामध्ये राज्यातील विद्यमान ९ मंत्र्यांसह १०७९ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत कैद होणार आहे.
- दुसऱ्या टप्प्यात १,५३,८५,९८३ मतदार १०७९ उमेदवारांसाठी मतदान करणार आहेत. यामध्ये ११९ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. राज्यातील रायपूरनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४६ उमेदवार आणि बिंद्रानवागढमध्ये सर्वाधिक कमी ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७२ जागांपैकी ४३ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने २७ आणि बहुजन समाज पार्टीने १ जागेवर विजय मिळवला होता. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
रिझव्र्ह बँक-सरकारमध्ये समेट!
- रिझव्र्ह बँकेकडील अतिरिक्त रक्कम सरकारला कशी हस्तांतरित करता येईल याबाबतचे मार्गदर्शन ही समिती करेल, असे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात झाली. बैठकीला १८ पैकी बहुतांश सदस्य उपस्थित होते.
- रिझव्र्ह बँकेच्या १८ सदस्यीय संचालक मंडळात खुद्द गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यासह चार डेप्युटी गव्हर्नरांचा समावेश आहे. तसेच मध्यवर्ती बँकेच्या क्षेत्रीय मंडळाचे ४ सदस्य मंडळात आहेत. याशिवाय केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून एस. सी गर्ग व राजीव कुमार हे केंद्रीय सचिव दर्जाचे दोन सदस्य व ७ स्वतंत्र संचालकांचा मंडळात समावेश आहे. ७ स्वतंत्र संचालकांमध्ये नुकतेच नियुक्त झालेले एस. गुरुमूर्ती आणि सतीश मराठे हे आहेत.
अर्थतज्ज्ञ पाणंदीकर यांचे निधन
- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व ‘फिक्की’चे माजी महासचिव डी. एच. पै पाणंदीकर यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ‘परवाना राज’चा जाच असलेल्या काळात पाणंदीकर यांनी भारतीय उद्योगविश्वाचा आवाज वारंवार सरकार दरबारी उठवला होता.सन १९८१ ते ९१पर्यंत त्यांनी ‘फिक्की’चे महासचिवपद भूषवले. वॉशिंग्टनमधील विख्यात इंटरनॅशनल लाइफ सायन्सेस इन्स्टिट्यूटच्या दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. इंडियन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटसह अनेक शैक्षणिक संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले होते. देशातील व्यापक अर्थस्थितीचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.
मेरी कोमचे पदक निश्चित; उपांत्य फेरीत धडक
- World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या वू यु हिला ५-० असे पराभूत केले. मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
- ४८ किलो वजनी गटात तिची झुंज चीनच्या वू यु हिच्याशी झाली. या सामन्यात मेरी कोमने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. चीनच्या प्रतिस्पर्ध्याला सामन्याच्या कोणत्याही क्षणाला तिने डोके वर काढू दिले नाही. तिच्या या सुंदर खेळीमुळे तिला या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला.