देशातील पहिला ‘रोबो-कॉप’, केरळ पोलिसांच्या सेवेत ‘केपी-बॉट’
- देशातील पहिला रोबोट पोलीस अर्थात रोबो-कॉप ‘केपी-बॉट’ केरळ पोलिसांच्या सेवेत दाखल झाला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ‘केपी-बॉट’चे उद्घाटन केले.
- केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला असून तो पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून ड्युटी करणार आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे मानवी रुप असलेला हा रोबो एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जागी काम करणार आहे. तो पोलीस मुख्यालयात आलेल्या लोकांचे स्वागत करेन आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्गही सांगेल.
- केपी-बॉट हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे.
विकी कौशलचा पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान
- उरी चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या विकी कौशलचा लोकमतकडून गौरव करण्यात आला. पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर या पुरस्कारानं विकीचा सन्मान करण्यात आला.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर विकीनं उपस्थितांशी मराठीत संवाद साधला. ‘मराठी माझी मातृभाषा नाही. पण दहावीपर्यंत मराठी शिकलो आहे.
सौदी 2 वर्षांत भारतात करणार सात लाख कोटींची गुंतवणूक;
- सौदी अरेबियाने दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला पूर्ण पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान बिन अब्दुल सऊद यांच्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
- याप्रसंगी सौदी प्रिन्स म्हणाले, गुप्तचर यंत्रणेपासून इतर सर्व गोष्टींत भारताला संपूर्ण सहकार्य केले जाईल.
- दोन्ही देशांत ११ महत्त्वपूर्ण करार झाले. तत्पूर्वी प्रिन्स सलमान पाकिस्तानातून भारतात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल तोडून विमानतळावर त्यांचे स्वागत केले. बुधवारी राष्ट्रपती भवनात सलमान यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
- पाकिस्तानला सौदीने २० अब्ज डॉलरचा (१ लाख ४३ हजार कोटी रुपये) करार केला होता. वास्तविक सौदीने पाकला आधीच सुमारे ४३ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. दुसरीकडे भारत-पाकने संवेदनशील मुद्द्यांवर आपसांत चर्चा करून प्रश्न सोडवावा, असा सल्ला प्रिन्स सलमान यांनी दिला.
मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, UN मध्ये पाक विरोधात ४० देश एकवटले
- भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या दिशेनं भारताच्या कुटनितीला यश आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनसह एकूण ४० देशांनी यासाठी समर्थन दिले आहे. फ्रान्स आज गुरूवारी यूएनमध्ये मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे.
- मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्याची संयुक्त राष्ट्र संघात ही दुसरी वेळ आहे. याआधी अमेरिकेने २०१७ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेच्या या प्रस्तावाला ब्रिटनने पाठिंबा दिला होता. मात्र, चीनच्या खोड्यामुळे संयुक्त राष्ट्र संघामध्ये तो प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा तसाच प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
आयसीसी’कडून प्रशिक्षक अन्सारींवर १० वर्षांची बंदी
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिरातीमधील प्रशिक्षक इरफान अन्सारी यांच्यावर १० वर्षांची बंदी घातली आहे. २०१७मध्ये पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदशी ‘भ्रष्ट इराद्यानेच’ संपर्क साधल्यामुळे ते दोषी सापडले आहेत.
- ‘आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक लवादासमोर झालेल्या सुनावणीत अन्सारी दोषी आढळले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या दोन संघांचे ते प्रशिक्षक असतानाही त्यांनी अशा प्रकारचे कृत्य दोनदा केले आहे. त्यामुळे एकंदर तीनदा त्यांनी नियमांचा भंग केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- ऑक्टोबर २०१७ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानची श्रीलंकेविरुद्ध मालिका चालू असतना अन्सारी यांनी सर्फराजशी संपर्क साधला. अन्सारी हे शारजा क्रिकेट परिषदेत गेली ३० वष्रे कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी शारजा क्रिकेट क्लबचे मुख्य प्रशिक्षकपदही भूषवले आहे.
अमितने युरोपमधील सलग दुसऱ्या मोठय़ा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले
- भारतीय बॉक्सिंगपटू अमित पांघलने स्ट्रांजा बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक शहीद जवानांना समर्पित केले. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना पदक समर्पित केले.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या अमितने युरोपमधील सलग दुसऱ्या मोठय़ा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. सैन्यदलात नायब सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या २३ वर्षीय अमितने स्पर्धेत उतरतानाच पदक मिळवून ४० शहीद सैनिकांना पदक समर्पित करण्याचा निर्धार केला होता.
- या स्पर्धेत रशिया, कझाकिस्तान आणि युक्रेन यांनी त्यांचे अव्वल बॉक्सिंगपटू उतरवले होते. त्यामुळे या स्पर्धेतील सुवर्णपदक हे माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे,’’ असे अमितने नमूद केले.