जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा मृत्यू
- जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाझो नोनाका यांचे निधन झाले आहे. वयाच्या ११३ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. नोनाका यांचा जन्म २५ जुलै १९०५ मध्ये झाला होता.
- १० एप्रिल २०१८ रोजी मसाझो यांनी आपल्या वयाची ११२ वर्षे आणि २५९ दिवस पूर्ण केले आणि त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलं होते.
- जपानच्या उत्तरेकडील होकायडो बेटावर नोनाका कुटुंबियासोबत वास्तव्यास होते
- जपान हा देश दीर्घायुषी लोकांसाठी प्रसिद्ध असून तेथील जेरोमॉन किमोरा यांचे २०१३ मध्ये वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले होते.
सुप्रिया सुळे, राजीव सातव ठरले ‘संसद रत्न’
- प्राईम टाइम फाउंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि हिंगोलीचे काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव यांना प्रदान करण्यात आला.
- चेन्नई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना तो प्रदान करण्यात येतो. यंदा पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.
- संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली जाते.
डिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्घाटन
- संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री निर्माण करण्यास यामुळे बळकटी येणार आहे.
- या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये 3,038 कोटी रुपयांची गुंतवणूक उद्घाटनावेळीच जाहीर झाली आहे. यातील बहुतांशी गुंतवणूक ही सार्वजनिक क्षेत्रातून आली असून, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी अनुक्रमे 2,305 कोटी, 140.5 कोटी आणि 150 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- टीव्हीएस, डेटा पॅटर्न आणि अल्फा डिझाइन्स या खासगी कंपन्यांनीही अनुक्रमे 50 कोटी, 75 कोटी आणि 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लॉकहिड मार्टिन या जागतिक स्तरावरील बड्या कंपनीनेही गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
- तर हा कॉरिडॉर चेन्नई, होसूर, सालेम, कोइमतूर आणि तिरुचिरापल्ली या शहरांदरम्यान असणार आहे. स्थानिक उद्योगांचा या कॉरिडॉरला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे सीतारामन यांनी या वेळी सांगितले.
वैष्णवी मांडेकरची लिम्काबुकमध्ये नोंद
- जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे.
- वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे 24 सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्या फोडण्याचा विक्रम केला होता.
- वैष्णवीने तिची पुण्यातील मैत्रीण अस्मिता जोशी हिच्यासमवेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्डने त्या विक्रमाबद्दलचे पाठविलेले प्रमाणपत्र तिला नुकतेच मिळाले. क्रीडा प्रशिक्षक विक्रम मराठे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
- आतापर्यंत तिने मातोल कराटे क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक कमावला आहे. ती सध्या पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच बालेवाडी येथे झालेल्या नॅशनल रूरल चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले.
Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता
- मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षातही केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व पहायला मिळालं. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने बाजी मारली.
- या दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचं कडवं आव्हान मोडीत काढत मानाच्या मुंबई मॅरेथॉनचा किताब पटकावला. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने पहिलं तर सुधा सिंहने महिलांच्या गटात पहिलं स्थान मिळवलं.पुरुषांमध्ये गोपी टी. ने दुसरं तर करणसिंहने तिसरं स्थान मिळवलं.
- दुसरीकडे मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू मुगाता आणि महिलांमध्ये मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. हाफ मॅरेथॉन प्रकारात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला तिसरं तर महिलांमध्ये महाराष्ट्राच्या साईगीता नाईकने दुसरं स्थान पटकावलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
- श्रीनू मुगाताने 1 तास 5 मिनीटं आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. महिलांमध्ये मीनू प्रजापतीने 1 तास 18 मिनीटं 5 सेकंद इतका वेळ घेतला. कालिदास हिरवे आणि साईगीता नाईक यांच्या रुपाने हाफ मॅरेथॉनवर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा पगडा पहायला मिळाला.
पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीनं सोडलं नागरिकत्व
- पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आता आणखी बिकट होणार आहे. कारण चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, चोक्सीने भारतीय पासपोर्ट एंटीगुआ उच्च आयोगामध्ये जमा केला आहे.
- मेहुल चोक्सीने आपला पासपोर्ट क्र. Z3396732 कन्सिल्ड बुकसोबत जमा केला आहे. भारतीय नागरिकता सोडण्यासाठी त्याला १७७ डॉलरचा ड्राफ्टही जमा करावा लागला आहे.
- नागरिकता सोडण्याच्या फॉर्ममध्ये चोक्सीने आपला नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस, एंटीगुआ असा नोंदवला आहे.
- पंतप्रधान कार्यालयाने चोक्सीचे नागरिकत्व सोडल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालय आणि चौकशी एजन्सींकडून प्रगती अहवाल मागवला आहे. २०१७मध्ये चोक्सीने एंटीगुआचे नागरिकत्व घेतले होते