बालारफीक शेख ‘महाराष्ट्र केसरी’
- गुणांच्या जोरावर बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. 11-3 अशा गुणाने त्याने अभिजितला पराभूत केले.
- लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.
- बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते.
देशभरातील अव्वल 10 पोलीस स्थानके
- देशभरातील पहिल्या दहा पोलीस स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. 2018 या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकांमध्ये राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशनने अव्वल स्थान पटकावले आहे.
- गृह मंत्रालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या या देशभरातील दहा पोलीस स्थानकांचा गौरव करण्यात आला. स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत ही मानंकने निवडण्यात आली आहे.
- पोलीस स्टेशनची यादी पुढीलप्रमाणे :
- कालू (बिकानेर, राजस्थान), कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार), फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल), नेत्तापक्कम (पुदुच्चेरी), गुदेरी (कर्नाटक), चोपाल (हिमाचल प्रदेश), लाखेरी (राजस्थान), पेरियाकुलम (तामिळनाडू), मुन्स्यारी (उत्तराखंड) आणि कुडचरे (गोवा).
‘जीएसटी’ कपातीचा दिलासा
- वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळतो, अशी तक्रार असताना, आणखी २३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय शनिवारी ‘जीएसटी परिषदे’च्या ३१ व्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे टीव्ही संच, संगणकाचे मॉनिटर्स, सिनेमा तिकीट, पॉवर बँक आदी वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत.
- सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जीएसटी लागू असलेल्या आणखी सात वस्तूंना १८ टक्क्यांच्या करटप्प्यात आणण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत घेण्यात आला. सुधारित जीएसटी दर १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे नववर्षांची पहाट काही वस्तूंच्या स्वस्ताईने होईल.
- डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागू होईल.
- २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर
मॉनिटर आणि ३२ इंचापर्यंतचे दूरचित्रवाणी संच
डिजिटल कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर
मोबाइल पॉवर बँक
व्हिडीओ गेम नियंत्रक
क्रीडा साहित्य
वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट, गिअर बॉक्स
महाराष्ट्राच्या वेदांगीची आशियाई विक्रमाला गवसणी
- वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी महाराष्ट्राची सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने तब्बल २९ हजार किलोमीटर अंतर सायकलवरून १५४ दिवसांत पार करत ‘सर्वांत कमी वेळेत जगप्रदक्षिणा घालणारी आशियातील पहिली सायकलपटू’ तर ‘जगातील तिसरी महिला सायकलपटू’ होण्याचा मान पटकावला आहे.
- आपल्या या मोहिमेची सुरुवात जेथून केली त्या ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पुन्हा पोहोचून, १५ किमी सायकल चालवून वेदांगी हा विक्रम औपचारिकरीत्या पूर्ण करेल.
- सध्या ब्रिटनमधील बोर्नमाऊथ विद्यापीठात शिकणाऱ्या वेदांगीने याच वर्षी जुलै महिन्यात पर्थ येथे या परिक्रमेची सुरुवात केली होती. मात्र वाटेतील अनेक अडचणींमुळे यंदा तिचा विश्वविक्रम थोडक्यात हुकला. मात्र आपला निश्चय ढळू न देता दिवसाला तीनशे किलोमीटर अंतर १५९ दिवसांत पार करत तिने आशियाई विक्रमाला गवसणी घातली आहे. इटलीची पाओला जिनोट्टी हिने हे अंतर १४४ दिवसांत पार केले असून, तीन आठवड्यापूर्वी ब्रिटिश सायकलपटू जेनी ग्रॅहम या ३८ वर्षीय सायकलपटूने १२४ दिवसात पार करण्याचा विक्रम केला होता.
रेयाल माद्रिदची पुन्हा क्लब विश्वचषकाला गवसणी
- प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेल्या रेयाल माद्रिदने अल अैन संघाला ४-१ अशी धूळ चारून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे झालेल्या क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यंदाच्या चॅम्पियन्स लीगच्या विजेत्या रेयालचे हे सलग चौथे क्लब विजेतेपद ठरले.
- रेयालसाठी लुका मॉड्रिचने १४व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर मार्कोस लॉरेंटने ६०व्या आणि सर्गियो रामोसने ७८व्या मिनिटाला अनुक्रमे दुसरा व तिसरा गोल नोंदवला.
- ८६व्या मिनिटाला त्सुआका शितोनीने अल अैन संघासाठी एकमेव गोल केला. ९२व्या मिनिटाला नादेर मुस्तफाने चुकीने स्वयंगोल करत रेयालच्या खात्यात चौथ्या गोल जमा केला.