भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल वाहतुकीसाठी सज्ज
- अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला भारतातील सर्वात लांब रेल्वे रुळ अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असून हा देशातील सर्वात लांब रेल्वेच्या मार्गावरील पूल असेल असे सांगितले जात आहे.
- या पूलाची लांबी ४.९ किमी असून तो ईशान्य भारतात बांधण्यात आला आहे. या पूलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचे सुमारे १० तास वाचणार आहेत. तब्बल २१ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाचे भुमिपूजन झाले होते.
- आसाममध्ये असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला असून त्याचे नाव बोगीबील असे ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आणि सुशासन दिवसाच्या निमित्ताने या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ७ वर्षांचा कारावास
- पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दोषी ठरवले आहे. इस्लामाबाद येथील न्यायालयाने ६८ वर्षीय शरीफ यांना अल अजीजिया प्रकरणात दोषी ठरवत ७ वर्षांची शिक्षा सुनावली. तर फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणात पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
- याशिवाय त्यांना २.५ मिलियन डॉलरच्या दंडाची शिक्षाही सुनावली आहे. दुसऱ्या एका घोटाळ्याप्रकरणी कारागृहात आहेत.
आता १०० रुपयांचं नाणं, वाजपेयींच्या स्मरणार्थ मोदींनी केलं अनावरण
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०० रुपयांचं नाणं जारी केलं आहे. वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस केंद्र सरकारकडून ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. संसदेच्या अॅनेक्सी भवनात मोदींनी या नाण्याचं अनावरण केलं.
- कसं आहे १०० रुपयांचं नाणं –
- १०० रुपयांच्या नाण्याच्या पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिले आहे. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि रोमन अक्षरांत INDIA असं लिहिलं आहे. प्रतिक चिन्हाच्याखाली १०० असे नाण्याचे मुल्य लिहिले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आणि देवनागरी व रोमन लिपीमध्ये त्यांचे नाव लिहिलेले आहे. तसेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूचे वर्ष १९२४ – २०१८ लिहिले आहे.