लान्सनायक नाझीर वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र
- काश्मीरमध्ये एकेकाळी दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या आणि नंतर प्रादेशिक सैन्यात जवान म्हणून भरती झालेल्या शहीद लान्स नायक नाझिर वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
- काश्मीर खोऱ्यातील शोपियामध्ये एका चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ते धारातीर्थी पडलेले होते.
- जवान वानी शहीद झाले त्यावेळी ३४ राष्ट्रीय राय़फल्समध्ये त्यांची नियुक्ती होती.
- दहशतवाद्यांशी दोन हात करताना दाखवलेल्या अतुलनिय शौर्याबद्दल त्यांना यापूर्वी दोनदा सेना मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. कुलगामधील चेकी अशुमजी या गावचे ते रहिवासी आहेत. या ठिकाणी ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.
- अशोक चक्र शांततेसाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. त्यानंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे पुरस्कार येतात. दरम्यान, शहीद वानी यांच्याबरोबरच इतर चार सैन्य अधिकाऱ्यांना आणि जवानांना किर्ती चक्रने तर १२ जवानांना शौर्य चक्र जाहीर झाला आहे.
नव्या वर्षातील इस्त्रोची पहिली मोहिम यशस्वी,
लष्करी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने गुरुवारी रात्री मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या वर्षातील इस्त्रोची पहिलीच मोहिम यशस्वी ठरली आहे.
- मायक्रोसॅट आर हा ७४० किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. खास लष्करी उद्देशांसाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन रात्री ११.३७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४४ रॉकेट दोन्ही उपग्रहांना घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावले.
- कलामसॅट हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. अवघ्या १.२ किलो वजनाचा हा सर्वात हलका उपग्रह आहे.
- पीएसएलव्ही सी-४४ ने मायक्रोसॅट आरला कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले. संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या प्रयोगशाळेत मायक्रोसॅट आर उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिका कृष्णा सोबती यांचे निधन
- स्त्रियांचे भावविश्व, वेदना, स्वाभिमान आपल्या साहित्यांतून सशक्तपणे मांडणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका कृ्ष्णा सोबती यांचे आज निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. सफदरजंग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- कृष्णा सोबती यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५ रोजी पाकिस्तानमधील एका गावात झाला. १९५० मध्ये ‘कहानी लामा’पासून त्यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली.
- ‘मित्रो मरजानी’, ‘डारे से बिछडी’, ‘जिंदगीनामा’, ‘सूरजमुखी अंधेरे के’, ‘दिलो दानिश’, ‘समय सरगम’ आदी साहित्यकृतींची दखल घेण्यात आली होती. ‘समय सरगम’ आणि ‘जिंदगीनामा’ या साहित्यकृती हिंदी साहित्यातील कालातीत साहित्य मानल्या जातात. ‘जिंदगीनामा’साठी १९८० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, २०१७ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
- देशभरातील असहिष्णूतेच्या विरोधात २०१५ मध्ये आपला साहित्य अकादमी पुरस्कारदेखील परत केला होता.
विश्वविजेत्या कार्लसनकडून विश्वनाथन आनंद पराभूत
- भारताचा ‘चौसष्ट घरांचा राजा’ विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत पराभूत झाला. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहाव्या फेरीत आनंदला पराभूत केले.
- या पराभवामुळे आनंदचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे.
- आनंदचे सहा गुण असून तो चीनच्या किंग लिरेन व नेपोमिनियाची यांच्यासह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कार्लसनने सात गुणांसह आघाडी घेतली आहे.
- अनिश गिरी त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहे. इतर सामन्यात भारताच्या विदीत गुजराती याने रशियाच्या ब्लादिमिर क्रमॅनिकला पराभूत केले. हंगेरीच्या रिचर्ड रैपोर्टने पोलंडच्या ख्रिस्तोफला पराभूत केले. तर जॉर्डन वॉन फोरिस्ट याने इयान नेपोमिनियाची याचा पराभव केला.
राणा कपूर यांच्या जागी येस बँकेच्या प्रमुखपदी रणवीत सिंग गिल
- प्रसिद्ध बँकर राणा कपूर यांचे उत्तराधिकारी म्हणून अखेर बँकसमूहाबाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे. डॉइशे या विदेशी बँकेतील रणवीत सिंग गिल हे आता येस बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
- यापूर्वी बँकेने कपूर यांना मार्च २०२० पर्यंत प्रमुखपदी राहू देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
- मुख्याधिकारी निवडीकरिता येस बँकेने ‘आयआरडीएआय’चे माजी अध्यक्ष टी. एस. विजयन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने संभाव्य दोन उमेदवारांची शिफारस रिझव्र्ह बँकेला केली होती.
- डॉइशे बँक या जर्मनीच्या बँकेच्या भारतातील व्यवसायाची जबाबदारी गिल यांच्याकडे होती. विदेशी बँकेत ते १९९१ पासून कार्यरत आहेत. तर २०१२ मध्ये त्यांच्याकडे भारतातील व्यवसायाची धुरा सोपविण्यात आली. देशात बँकेच्या १६ शाखा आहेत.
- देशातील पाचवी मोठी खासगी बँक असलेल्या येस बँकेचे गेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षही जाहीर झाले. यानुसार बँकेने डिसेंबर २०१८ अखेर निव्वळ नफ्यातील ७ टक्के घसरण नोंदविली आहे.