Uncategorized
Current Affair 26 November 2018
ब्रेक्झिट कराराला युरोपीय महासंघाची मान्यता
- ब्रिटनने युरोपीय महासंघातून (युरोपियन युनियन) बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कराराला रविवारी युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी मान्यता दिली. युरोपीय महासंघाच्या ब्रिटन सोडून उर्वरित २७ देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. त्यामुळे त्यावर मतदान झाले नाही. आता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या काराराला मान्यता मिळणे गरजेचे असून त्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे.
- युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर ब्रिटनमध्ये जून २०१६ मध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यानंतर ब्रिटनने लिस्बन कराराचे ५० वे कलम लागू करून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली.
- क्झिट कराराला मंजुरी मिळवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये डिसेंबर महिन्यात मतदान होणार आहे.
- ब्रिटिश पार्लमेंटने ब्रेक्झिट कराराला मंजुरी दिल्यास तो प्रस्ताव पुन्हा युरोपीयन काऊन्सिलकडे जाऊन तेथे त्याला २७ पैकी किमान २० देशांनी मंजुरी देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याला युरोपीयन पार्लमेंटची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी २०१९ सालच्या सुरुवातीला मतदान अपेक्षित आहे. या सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्या तर ब्रिटन २९ मार्च २०१९ रोजी युरोपीय महासंघातून अधिकृतपणे बाहेर पडेल.
माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर यांचं निधन
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर यांचं (रविवार) दुपारी निधन झालं. बेंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.
- जाफर यांनी १९९१ ते १९९५ या कालावधीत रेल्वेमंत्रिपद भूषवले होते. कर्नाटकमध्ये रेल्वे गाड्यांचे मार्ग आधुनिकीकरणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
मुंबई हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून
५० लाख डॉलर्सचे बक्षीस
- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करण्यात आली असून ती ५० लाख डॉलर अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.
- मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. या हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
शरयू नदीच्या किनारी श्रीरामाची १५१ मीटर उंच मूर्ती उभी राहणार
- उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शरयू नदीच्या किनारी प्रभू श्रीरामाची १५१ मीटर उंचीची मुर्ती उभारण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी याची घोषणा केली. विशेष म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे ही मुर्ती साकारणार आहेत.
Gymnastics World Cup: दीपा कर्माकरला कांस्य पदक
- भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत १४.३१६ गुण मिळवत पदक आपल्या नावे केले.
- ब्राझीलची रिबेका एंड्रेडने सुवर्ण आणि अमेरिकेच्या झेड कारे ने रौप्य पदक मिळवले. त्रिपुराच्या २५ वर्षीय दीपाने पात्रतेत १६ खेळाडूंमध्ये सहावे स्थान पटकावले होते.
- बॅलन्स बीम वर्गात दीपाचे गुण ११.०६६ होता. ती २३ व्या स्थानी राहिली होती. तर पुरुष वर्गात राकेश पात्रा पॅरलल बार पात्रता सामन्यात १३.०३३ गुणांबरोबर २९ जिम्नॅस्टच्या यादीत तो १६ व्या स्थानावर राहिली.
कीर्तिकर कार्याध्यक्ष आणि पांडे कोषाध्यक्ष
- महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्याध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबई उपनगरच्या गजानन कीर्तिकर यांनी दत्ता पाथ्रीकर यांना नामोहरम केले, तर कोषाध्यक्षपदावर स्थान मिळवताना परभणीच्या मंगल पांडे यांनी कोल्हापूरच्या रमेश भेंडिगिरी यांना पराभूत केले.
- राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणी समितीवरील १४ पदांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन जागांसाठी रविवारी निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी पात्र ७४ मतदारांपैकी ७१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यात प्रतिष्ठेच्या कार्याध्यक्षपदासाठी मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष खासदार कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी औरंगाबाद कबड्डी संघटनेचे अध्यक्ष पाथ्रीकर यांना १९ मते मिळाली. यातील एक मत बाद ठरले. कोषाध्यक्षपदासाठी पांडे यांना ४७ आणि भेंडिगिरी यांना २४ मते मिळाली.
फायनलमध्ये सायनाचा पराभव
- गतविजेत्या सायना नेहवलला सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाला चीनच्या हान यू से कडून पराभवाचा सामना करावा लागला.
- चीनच्या हान यू सेने सायनाचा १८-२१ , ८-२१ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. भारताच्या फुलराणीने याआधी २००९, २०१४ आणि २०१५ साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवासह सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सायनाचे चौथ्यांदा विजेतेपदाचे स्वप्न चीनच्या हान यू से ने मोडीत काढले.