नव्या वर्षातील पाच ग्रहणांपैकी भारतीयांना दिसणार दोन
- नवे वर्ष हे अवकाश क्षेत्रासाठी खास वर्ष असेल, याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये वर्षभरात तीन सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे होणार आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, यातील २ ग्रहणे ही भारतातून दिसू शकणार आहेत.
- ६ जानेवारी रोजी अंशिक सूर्यग्रहण दिसणार असून ते भारतात दिसणार नाही. यापुढील ग्रहण २१ जानेवारी रोजी असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असून यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे ग्रहणही भारतात दिसणार नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी भारतात दिवस असल्याने प्रकाश असेल.
- २ आणि ३ जुलैदरम्यान पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. मात्र यावेळी भारतात रात्र असल्याने हे सूर्यग्रहणही भारतीयांना दिसणार नाही. तर याच महिन्याच्या १६ आणि १७ तारखेला अंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी २ तास ५८ मिनिटे इतका असेल.
- हे ग्रहण दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका ऑस्ट्रेलियासोबतच आशिया खंडातही दिसणार आहे.
मनू भाकरची दुहेरी चमक
- राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत युवा नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल गटात कनिष्ठ आणि महिला गटात चमक दाखवीत दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावले.
- युवा ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मनूने तिची लय कायम राखली आहे. कनिष्ठ गटात मनूने १३ वर्षांच्या ईशा सिंगवर दोन गुणांच्या फरकाने मात केली. मनूने २४२.१ गुणांसह प्रथम, ईशाने २४०.४ गुणांसह द्वितीय तर अनुराधाने २१९.३ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
- अंतिम फेरीत हिनाला १९७.३ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पात्रता फेरीत द्वितीय स्थानी असलेल्या मनूने अंतिम फेरीत २४४.५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
- युवा १० मीटर एअर पिस्तूल गटात सौम्या ध्यानीने २४१.४ गुणांसह प्रथम, विभूती भाटियाने २३७.६ गुणांसह द्वितीय तर यशस्वी जोशी २१५.३ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. काही दिवसांपूर्वीच मनूने महिलांच्या आणि कनिष्ठ गटाच्या २५ मीटर प्रकारात अव्वल स्थान पटकावले होते.
९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन नागपुरात
- अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन यंदा नागपूरमध्ये २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मुंबईत झालेल्या नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
- ३२ वर्षांनी नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान विदर्भाला मिळाला आहे.
- विदर्भात यापूर्वी १९१२ मो.वि. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीला, १९३९ मध्ये कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९६२ मध्ये शं.नी. चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९७५ मध्ये भालचंद्र पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळला, १९८२ मध्ये पं. वसंतराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्याला आणि १९८५ मध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला संमेलन झाले होते. आता १९८५ नंतर विदर्भात २२ ते २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वर्षांनंतर नाटय़ संमेलन होत आहे.
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर
- ‘तिहेरी तलाक’ दिल्यास तीन वर्षांच्या कारावसाची शिक्षा देणारे सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
- केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत तिहेरी तलाकविरोधी सुधारणा विधेयक सभागृहात मांडले. यापूर्वीही लोकसभेत ‘तिहेरी तलाक’ विधेयक संमत झाले आहे. मात्र, राज्यसभेत त्याला मंजूर मिळण्यात अडचणी आल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात वटहुकूम काढला होता.
- सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक घटनाबाह्य़ असल्याचा निकाल दिल्यानंतरही वर्षभरात ४०० हून अधिक मुस्लीम महिलांना तिहेरी तलाक दिला गेला. हे वास्तव लक्षात घेऊनच विधेयक आणले गेले आहे. पाकिस्तान, बांगलादेशसहित २२ मुस्लीम देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली असून तो गुन्हा समजला जातो.
- मुस्लीम धर्मात लग्न हा करार समजला जातो. कोणालाही करारात दोन्ही बाजूंसाठी समान अटी-शर्ती लागू होतात.