कामगार चळवळीचे पितामह जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन
- ‘आवाज कुणाचा…’ या घोषवाक्याला ‘कामगारांचा…’ असं निर्विवाद उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित ‘बंदसम्राट’ व देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते.
- फर्नांडिस यांच्या निधनामुळं देशातील कामगारांसाठी प्राणपणानं झुंजणारा ‘योद्धा’ हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.
- स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचं समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकलं होतं. ३ जून १९३० रोजी जन्मलेले जॉर्ज बालपणापासूनच चळवळ्या व बंडखोर स्वभावाचे होते.
- पुढं ते कामगार चळवळीत सक्रिय झाले. १९७४ च्या रेल्वे संपापासून जॉर्ज खऱ्या अर्थानं नेते म्हणून उदयास आले. आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशानं पाहिला. आणीबाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा वेष धारण केला होता. अटकेनंतर तुरुंगात ते कैद्यांना भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवायचे.
- केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते.
384 वडाची झाडं लावणाऱ्या 106 वर्षीय आजीबाईचा ‘पद्मश्री’नं गौरव
- केंद्र सरकारकडून 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील हुलिकल गावच्या 106 वर्षीय आजीबाईंच नाव आहे. झाडांवर प्रेम करणाऱ्या या आजीबाईच नाव आहे सालुमार्दा थिमक्का. तब्बल 106 वर्षीय आजींच्या पर्यावरणप्रेमी कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे.
- झाडांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत. त्यानंतर, या आजीबाईंनी चक्क झाडं लावण्याचा सपाटाच सुरू ठेवला. त्यामुळे थिमक्कांना आता ‘सालुमार्दा थिमक्का’ असं नाव मिळाल आहे. सालुमार्दा म्हणजे एका रांगेत लावलेली झाडं. त्यामुळं त्यांच्या गाडीवर ‘सालुमार्दा थिमक्का’ असं लिहिलेल आहे.
चीननं उभारला जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज
- जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज चीनमध्ये उभारण्यात आला आहे. शांघायमधील वाटसरूंसाठी हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची लांबी 26.3 मीटर आणि रुंदी 3.6 मीटर एवढी आहे. रोबोटिक आर्म्सच्या मदतीनं केवळ 19 दिवसांमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. यामध्ये 3D-प्रिंटेड 44 काँक्रीट ब्लॉकचाही वापर करण्यात आला आहे. हा पूल उभारण्यासाठी 2 लाख 70 हजार युआन (जवळपास 28.09 लाख रुपये) एवढा खर्च करण्यात आला आहे.
- शांघायमधील Wisdom Innovation Parkमध्ये हा ब्रिज बांधण्यात आला आहे. चीनच्या 3D प्रिंटिंग म्युझिअमव्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्सवर काम करणाऱ्या टॉप हायटेक कंपनीचं कार्यालयदेखील या पार्कमध्ये आहे. पुलावर पडणाऱ्या वजनाची नोंद ठेवण्यासाठी विशेष असे तंत्रज्ञानदेखील येथे उपलब्ध आहे. 3 डी तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रिज बांधण्यात आल्याने याचा खर्च 33 टक्के कमी झाला आहे.
एटीपी टेनिस क्रमवारीत जोकोव्हिच अग्रस्थानी
- सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने पुरुषांच्या एटीपी टेनिस क्रमवारीमध्ये आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले. उपांत्यपूर्व फेरीआधीच पराभूत झालेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
- स्पेनच्या राफेल नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तरी त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. फेडररची तिसऱ्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
- अलेक्झांडर झ्वेरेव याने तिसरे स्थान पटकावले असून हुआन मार्टिन डेल पोट्रो चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. जपानचा केई निशिकोरीने सातवे स्थान प्राप्त केले आहे.
प्रफुल्ल शिलेदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार
- साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मान यंदा प्रफुल्ल शिलेदार यांनी ज्ञानेंद्रपती यांच्या हिंदीतून अनुवादीत केलेल्या ‘संशयात्मा’ काव्यसंग्रहास मिळाला आहे.
- अकादमीने 2018 मधील अनुवादित साहित्यकृतींच्या पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 24 भाषांमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांना पुरस्कार घोषित झाला आहे.
- राजवाडे लेखसंग्रह या विश्वनाथ राजवाडे लिखित मराठी निबंधांच्या कोंकणी अनुवादासाठी नारायण भास्कर देसाई यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीच्या निवड मंडळावर अनंत भावे, प्रभा गणोरकर व डॉ. विलास खोले होते. कोंकणी अनुवादीत पुस्तकाचे नाव ‘राजवाडे लेखसंग्रह’ असे आहे.
- फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्रा’च्या आसामी अनुवादासाठी पार्थ प्रतिम हजारिका यांना पुरस्कार घोषित झाला. पन्नास हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुवादित पुस्तकांत मूळ हिंदी साहित्यकृती सर्वात जास्त आहेत. त्याखालोखाल बंगाली साहित्याचा अनुवाद करणार्यांचा आहे.