Uncategorized
Current Affair 29 November 2018
यशस्वी झेप! इस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले ३१ उपग्रह
- अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. इस्त्रोने गुरुवारी सकाळी पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी ३१ उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हायसिस हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. अन्य उपग्रहांमध्ये आठ देशांचे ३० छोटे उपग्रह असून अमेरिकेचे सर्वाधिक २३ उपग्रह आहेत.
- आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही सी ४३ ने सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने झेप घेतली. पीएसएलव्हीचे हे ४५ वे उड्डाण आहे. अवकाशातील दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे उपग्रह सोडण्यात येतील. ही संपूर्ण प्रक्रिया ११२ मिनिटांची असेल. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे. इस्त्रोने मागच्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वाधिक १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
- भारतात कारखान्यांमधून मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. हायसिसच्या मदतीने आता या प्रदूषणावर लक्ष ठेवता येईल असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. पृथ्वीच्या पुष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पति आणि अन्य माहिती मिळवता येणार आहे. शास्त्रज्ञ त्यांना काय हवे आहे ती माहिती ते घेऊ शकतात. प्रदूषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. ३८० किलो वजनाच्या हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असेल.
‘डेथ आॅन विंग्स’ला मिळाला तिसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- औरंगाबाद येथील जागतिक किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी राजस्थानमधील ताल छापर राष्ट्रीय उद्यानात काढलेल्या ‘डेथ आॅन विंग्स’ या छायाचित्राला ‘सेन्च्युरी एशिया’च्या ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आॅफ द इयर’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. याआधी याच छायाचित्राला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
- हरणाच्या पाडसाची शिकार करणाऱ्या गरुडाचे हे छायाचित्र भारतातून ३८ हजार, आशियातून ८ हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आलेल्या १२ हजार छायाचित्रांतून अव्वल ठरले. राजस्थानातील ताल छापर उद्यानात हरणाच्या दोन दिवसांच्या पाडसाची गरुड शिकार करत असतानाचा क्षण कॅमेºयात टिपण्यासाठी बैजू यांना तब्बल तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. हे छायाचित्र मार्च २०१७ मध्ये काढण्यात आले.
नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य लवकरच ‘रामसार’च्या यादीत
- महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य लवकरच ‘रामसार’ या यादीत समाविष्ट होणार आहे. या यादीत देशातील २६ पाणथळ क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात राज्यातील एकही क्षेत्र नव्हते. नांदुरमध्यमेश्वरला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे पाणथळ क्षेत्र अधिक संरक्षित होण्यास हातभार लागणार आहे.
- तापमानाचा पारा खाली उतरत असताना या अभयारण्यात सध्या २० हजारहून अधिक परदेशी, स्वदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये रोहित पक्ष्यांचा आकडा पहिल्यांदाच ७०० वर पोहोचल्याचे वन्यजीव विभागाचे निरीक्षण आहे.
नागनदी स्वच्छतेसाठी जपानची मदत : ‘जिका’सोबत करार
- नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पातील अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी ‘जिका’चे शिष्टमंडळ नागपुरात आले. अर्थसहाय्य देण्याच्या दृष्टीने होणार असलेल्या सर्वेक्षणासंदर्भात बुधवारी जिका आणि मनपामध्ये झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी दिली. सन २०३४ पर्यंत नाग नदी सांडपाणीमुक्त होईल, असे उद्दिष्ट आहे.